ऑनलाईन टीम / मुंबई :
ठाण्याच्या भिवंडी परिसरातील चामुंडा कॉम्प्लेक्समध्ये असलेल्या फर्निचर गोदामांना आज पहाटे भीषण आग लागली. या आगीत फर्निचरची तीन गोदामे जळून खाक झाली असून, सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही.
मिळालेल्या माहितीनुसार, शुक्रवारी पहाटे चामुंडा कॉम्प्लेक्समधील एका फर्निचर गोदामाला भीषण आग लागली. काही वेळातच आगीने उग्र रुप धारण केल्याने आग शेजारच्या इतर गोदामांमध्ये पसरली. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या चार गाडय़ा घटनास्थळी दाखल झाल्या. पाच तासांच्या अथक प्रयत्नांनंतर आगीवर नियंत्रण मिळवण्यावर अग्निशमन दलाच्या जवानांना यश आले. तोपर्यंत तीन गोदामे जळून खाक झाली होती. आग लागलेल्या गोदामात फर्निचर तयार करणारे मशीन आणि मोठय़ा प्रमाणात लाकडी साहित्य, लाकूड होते. ही आग शॉर्ट सर्किटमुळे लागली असल्याचा प्राथमिक अंदाज आहे. या आगीत अद्याप कोणतीही जीवितहानी झाल्याचे वृत्त नाही.