दानपेटीतील पैशांसाठी दरोडेखोरांचे कृत्य
प्रतिनिधी / बेंगळूर
मंदिराच्या दानपेटय़ांमधील पैशांसाठी तीन पुजाऱयांच्या डोक्यात दगड घालून निर्घृण हत्या करण्यात आल्याची घटना मंडय़ा शहरात घडली आहे. या घटनेमुळे खळबळ उडाली आहे. प्रसिद्ध अर्केश्वर मंदिरामध्ये हा प्रकार घडला आहे. गणेश (वय 45), प्रकाश (52) आणि आनंद (वय 33) अशी हत्या झालेल्या पुजाऱयांची नावे आहेत.
घटनेविषयी अधिक माहिती अशी की, अर्केश्वर मंदिर हे ‘अ’ श्रेणीतील असून धर्मादाय खात्याच्या अखत्यारित येते. गणेश, प्रकाश आणि आनंद हे तिघे मंदिरामध्ये नियमित पूजा करत, तर रात्री तेथेच सुरक्षा रक्षक म्हणून काम करत होते. गुरुवारी रात्री नेहमीप्रमाणे जेवण करून ते तिघेही मंदिरात झोपी गेले होते. रात्रीच्या गस्तीवर असलेले पोलीस मध्यरात्री 12.30 वाजता पुजाऱयांजवळील पुस्तिकेत स्वाक्षरी करून निघून गेले. रात्री 2 ते 3 दरम्यान दरोडेखोरांनी मंदिरात प्रवेश करून गाढ झोपेत असलेल्या तिन्ही पुजाऱयांच्या डोक्यात दगड घालून त्यांची निर्घृण हत्या केली. त्यानंतर त्यांनी मंदिरातील तीन दानपेटय़ा उचलून नेल्या. दरोडेखोरांची संख्या नेमकी किती होती, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.
शुक्रवारी सकाळी 6 च्या सुमारास मंदिरात पुजेसाठी आलेल्या व्यक्तीला दरवाजा उघडा असल्याचे आढळून आले. आतमध्ये गेल्यानंतर त्याला पुजाऱयांचे मृतदेह रक्ताच्या थारोळय़ात पडल्याचे दिसून आले. यामुळे भयभीत झालेल्या व्यक्तीने आरडाओरड करीत इतरांना व पोलिसांना माहिती दिली.
मंदिरातील दानपेटय़ांमधील पैसे दर चार महिन्यांनी काढून बँकेत जमा केले जात होते. मात्र, लॉकडाऊनमुळे मागील आठ महिन्यांपासून दानपेटीतील पैसे काढून मोजदाद करण्यात आली नव्हती. याविषयी माहिती असणाऱयांनीच नियोजनबद्धपणे हे कृत्य केल्याचा संशय आहे. दरोडेखोरांनी दानपेटीतील पैशांबरोबरच मंदिरातील सोन्या-चांदीचे दागिने लंपास केले आहेत. दरोडेखोरांनी दानपेटय़ा मंदिराबाहेर फोडून नाणी तेथेच टाकली आणि फक्त नोटा लांबविल्या आहेत. घटनास्थळी वरिष्ठ पोलीस अधिकारी, जिल्हाधिकारी वेंकटेश, आमदार श्रीनिवास, तहसीलदार व इतर अधिकाऱयांनी भेट देऊन पाहणी केली.
आठ सीसीटीव्ही कॅमेरे पण, बंद अवस्थेत
मंदिराबाहेर आणि आतील बाजूस आठ सीसीटीव्ही कॅमेरे आहेत. मात्र, ते बंद अवस्थेत आहेत. त्यामुळे घटनेसंबंधीचे दृष्य चित्रित होऊ शकले नाही. पोलिसांनी कॅमेऱयांचे फुटेज तपासले असता ते 25 ऑगस्टपासून बंद असल्याचे निष्पन्न झाले आहे. मंदिराबाबतची संपूर्ण माहिती असणाऱयांनीच हे कृत्य केल्याचा संशय असून पोलिसांनी तपास हाती घेतला आहे. मंडय़ा जिल्हा पोलीस प्रमुखांच्या नेतृत्वाखाली तपास पथक नेमण्यात येईल, असे दक्षिण विभागाचे पोलीस महानिरीक्षक विपुलकुमार यांनी सांगितले आहे.
बॉक्स…..
पुजाऱयांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी 5 लाखांची मदत
हत्या झालेल्या मंडय़ा येथील अर्केश्वर मंदिराच्या पुजाऱयांच्या कुटुंबीयांना राज्य सरकारने 5 लाख रुपये मदत जाहीर केली आहे. मुख्यमंत्री येडियुराप्पा यांनी घटनेविषयी दुःख व्यक्त केले असून मृत पुजाऱयांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी 5 लाख रुपये मदतीची घोषणा केली.