प्रतिनिधी / शिराळा
गेली काही दिवस मंदिरे बंद होती. त्यामुळे भाविकांना दर्शन घेणे बंद झाले होते. आता दारं उघडताच सकाळपासूनच भाविकांनी अंबाबाईच्या दर्शनासाठी मंदीर गाठलं.अंबाबाई हे शिराळकरांचे आराध्यदैवत आहे.दरवर्षी येथे नागपंचमीला मोठी यात्रा भरते.
शिराळाकरांच्या दिवसांची सुरूवातच अंबाबाईच्या दर्शनाने होते.आपलं काम सुरू करण्यापूर्वी अंबाबाईचे दर्शन हा नित्यनेमच आहे इथे. यात मार्च पासून खंड पडला होता.बाहेरगावी प्रवासासाठी निघताना सुद्धा अंबाबाई चे दर्शन घेतल्या शिवाय शिराळकर वेस ओलांडत नाही. आता मंदिर सुरू झाल्यानं भल्या पहाटे भाविक दर्शनासाठी येऊ लागले आहेत.
३२ शिराळा हे धार्मिक पर्यटन स्थळ आहे. नाथ संप्रदायातील गोरक्षनाथांचे मंदिर, रामदास स्वामीनी स्थापन केलेले वीर मारूती तसेच इतर अनेक पुरातन मंदिरे इथे आहेत. तालुक्यासह राज्य भरातून भाविक दर्शनासाठी येत असतात. मंदीरे बंद असल्याने बाहेरील लोकांचा ओघ थांबला होता. त्याचा फटका इथल्या स्थानिक विक्रेत्यांना बसला होता. आता मंदिरे खुली झाल्यांने भाविकांसह छोटे मोठे व्यावसायिक देखील समाधान व्यक्त करत आहेत.
नगरपंचायतीने सुद्धा या सर्व मंदिर परिसरात स्वच्छता मोहीम राबवली. संपूर्ण मंदिर परिसरात सॅनिटायझर फवारणी करण्यात आली. पुरेशी खबरदारी घेऊन लोकांनी मंदिरात प्रवेश करावा. विनाकारण गर्दी करू नये असे आवाहन करण्यात आले.