पेडणे ( प्रतिनिधी)
मगो पक्षाची येणाऱया निवडणुकीत भाजपशी युती होणार नाही. किमान 25 मतदारसंघात मगो पक्ष आपले उमेदवार उभे करणार आहे. पेडणेतून प्रवीण आर्लेकर तर मांदे मतदारसंघातून जीत आरोलकर निवडणूक लढविणार, अशी घोषणा मगो पक्षाचे अध्यक्ष दीपक ढवळीकर यांनी पेडणे येथे केली.
पेडणे येथील मगो पक्षाच्या कार्यालयात आयोजित केलेल्या नरेश कोरगावकर व त्यांच्या असंख्य कार्यकर्त्यांच्या पक्ष प्रवेश कार्यक्रमात मगो अध्यक्ष दीपक ढवळीकर व्यासपीठावरून बोलत होते. यावेळी त्यांच्यासोबत पेडणे मगो नेते प्रवीण आर्लेकर, मांदे मगो नेते जीत आरोलकर, पक्षाचे प्रवक्ते उमेश तळवणेकर, केंद्रीय सदस्य सुदीप कोरगावकर, नुकतेच मगो पक्षात पदार्पण केलेले नरेश कोरगावकर, हळर्ण पंचायतीच्या पंचसदस्या आश्वीनी परब, माजी सरपंच राजेंद्र खडपकर, विनिता मांदेकर, रमाकांत तेली, उमेश कामुलकर, वसंत गडेकर, मधुकर कांबळी व इतर मान्यवर उपस्थित होते.
आता निवडणूक आल्याने भाजप आता नोकरीचे आमिष देऊन, दुसऱया पक्षाबद्दल टीका करून, आर्थिक आमिष देऊन मतदारांना आपल्याकडे ओढण्याचा प्रयत्न करीत आहे, या पक्षावर विश्वास ठेवू नका, असे आवाहन दीपक ढवळीकर यांनी केले. मगो पक्षाचे काम जोमाने सुरू करा, येणाऱया निवडणुकीत पेडणेतील दोन्हीही जागा मगो पक्षालाच मिळायला पाहिजे, असे आवाहन ढवळीकर यांनी कार्यकर्त्यांना केले.
मगो पक्ष या मातीतलाः जीत आरोलकर
मगो पक्ष हा या मातीतील पक्ष असल्याने प्रत्येकाला हा पक्ष आपलासा वाटतो. विद्यमान आमदार ज्या प्रकारे सामान्य जनतेला वागणूक देत आहे ती पाहिल्यास मतदार आमदारापासून तुटत आहे. मगो पक्षाचे पेडणेचे उमेदवार प्रवीण आर्लेकर सर्वांना घेऊन पुढे जात आहे, हे पाहून खूप बरे वाटले. त्यांनी या मतदारसंघात जे काम सुरू केले आहे ते पाहता त्यांच्याबरोबर नवीन-नवीन कार्यकर्ते या पक्षाला उत्साहाने जोडत आहेत. यामुळे प्रवीण आर्लेकर यांच्या रूपाने या मतदारसंघात पुन्हा एकदा मगो पक्षाची डरकाळी फोडेल असा विश्वास आहे, असे प्रतिपादन जीत आरोलकर यांनी केले.
स्वाभिमानी पेडणेकर बाबूंना जागा दाखवणारः नरेश कोरगावकर
मंत्री बाबू आजगावकर यांची दादागिरी पेडणेत वाढली आहे. स्वाभिमानी पेडणेकर येणाऱया निवडणुकीत बाबू आजगावकर यांना त्यांची योग्य जागा दाखविणार, असे नरेश कोरगावकर म्हणाले.