वार्ताहर/ हिंडलगा
मण्णूर येथील हिंदवी स्वराज्य युवा संघटना व ग्रामस्थाच्यावतीने सालाबादप्रमाणे नवरात्रोत्सवानिमित्त आयोजित श्री दुर्गामाता दौडला युवकांचा उत्स्फुर्त प्रतिसाद लाभत आहे. कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर गर्दी टाळून मोजक्याच कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत सामाजि अंतराचे भान ठेवून केलेली दौडचे नियोजन लक्षवेधी ठरत आहे.
शनिवारपासून गणपत गल्लीतून दौडला सुरुवात करण्यात आली. संघटनेतर्फे कोरोनापासून कार्यकर्त्यांचे रक्षण करण्यासाठी अत्यंत निटनेटकेपणाने दौडचे नियोजन करण्यात आले आहे. तर दौडच्या स्वागतासाठी प्रत्येक गल्लीमध्ये भगव्या पताका आणि ध्वज लावून वातावरण भगवेमय करण्यात आले आहे. फुलांचा वर्षाव आणि रंगीबेरंगी रांगोळ्या घालून महिलांनी देखील उत्स्फूर्तपणे दौडचे स्वागत करण्यास हातभार लावला आहे. तर सहभागी कार्यकर्त्यांच्या छत्रपती शिवाजी महाराज की जय, जय भवानी, जय शिवाजी आदी घोषणांचा जयघोषाने वातावरण शिवमय बनले आहे. प्रत्येक दिवशी पहाटे साडेपाच वाजता विविध गल्लीतून दौडची सुरुवात करून छत्रपती श्री शिवाजी महाराज चौकात सांगता केली जात आहे. याच दरम्यान सुवासिनींकडून ठिकठिकाणी औक्षण करून दौडचे स्वागत केले जात आहे. तर सामाजिक कार्यकर्त्यांकडून कार्यकर्त्यांसाठी अल्पोपहाराची सोय केली जात आहे. दौड यशस्वी करण्यासाठी संघटनेचे पदाधिकारी, कार्यकर्ते व ग्रामस्थ परिश्रम घेत आहेत.