प्रतिनिधी/ म्हापसा
म्हापसा पालिकेच्या निवडणुका होऊन मतदान पेटय़ा स्ट्राँग रुममध्ये सिलबंद करून आतमध्ये कडक पोलीस बंदोबस्तात ठेवण्यात आल्या आहेत. मात्र शनिवारी दुपारी आतमध्ये अज्ञात व्यक्ती जाऊन त्या फोडण्यात आल्या असल्याची एकच अफवा झाल्याने म्हापशातील काही उमेदवारांनी मतदान केंद्रावर धाव घेऊन तेथे जाऊन पाहणी केली. यावेळी काहीवेळ वातावरण तंग झाले असले तरी ही अफवा असल्याचे समजल्यावर उपस्थितांनी तेथऊन काढता पाय घेतला.
घटनेची माहिती मिळाल्यावर पोलीस उपअधीक्षक गजानन प्रभूदेसाई, निरीक्षक तुषार लोटलीकर, संयुक्त मामलेदार शैलेंद्र देसाई आदी अधिकारी वर्गांनी घटनास्थळी धाव घेतली. याबाबत म्हापसाचे एक उमेदवार जॉन लोबो यांनी रीतसर पोलीस तक्रार म्हापसा पोलीस स्थानकात केल्यावर पोलिसांचीही धावपळ झाली. ही माहिती सोशल मिडीयावरून सर्वत्र वाऱयासारखी पसरल्यावर सर्वांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलीस अधिकाऱयांसमवेत काही उमेदवारांनी आतमध्ये जाऊन स्ट्राँग रुमची पाहणी करून समाधान व्यक्त केले. आतमध्ये पोलीस पहारा होता तसेच ज्या खोलीमध्ये मतपेटय़ा ठेवण्यात आल्या आहे ती खोली पूर्णतः सिलबंद करण्यात आली आहे. त्या खोलीची उमेदवारांनी पाहणी केली मात्र त्यांना संशयास्पद असे काहीच आढळून आले नाही.
दरम्यान सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार येथे भला मोठा बोर्ड आदी सामान ठेवण्याचे काम सुरू होते. एक स्टाफ कर्मचारी त्या कामी आतमध्ये गेला होता. त्याच्याकडे सोपस्कार ओळखपत्र आदी परवानगी होती. पोलीस पहाराही होता. येथे आजूबाजूला मतदान दिवसाची तयारीही सुरू होती. संयुक्त मामलेदार श्री. देसाई यांनी येथील सर्व भागाची पाहणी केली व संशयास्पद असे येथे काहीच नसल्याचे स्पष्ट केले. मतदान झाल्यावर सर्व मतपेटय़ा आम्ही सिलबंद करून आतमध्ये ठेवल्या व बाहेर पोलीस पहाराही तैनात ठेवण्यात आल्याचे त्यांनी स्पष्ट केले. नाहक अफवा करू नये असे आवाहनही त्यांनी केले.
दरम्यान एका आमदाराने येथे आम्ही काल सही केलेला पेपर आम्हाला बाहेर पडल्याचे आढळून आल्याचा आरोप करीत त्याची माहितीही संयुक्त मामलेदारांना दिली. मात्र मालेतदारांनी ती झेरॉक्स प्रत असल्याचे सांगून त्या सह्या पूर्वी घेतल्याचे स्पष्ट केले.