दिशादर्शक फलकावर लावला होता जाहिरात फलक
प्रतिनिधी /बेळगाव
शहरात जाहिरात फलक लावण्यावर बंदी घातली आहे. त्यामुळे विविध चौक आणि रस्त्यांशेजारी लावलेले फलक हटविण्यात आले आहेत. मात्र, ठिकठिकाणी उभारलेल्या कॅन्टीलिव्हर आणि गँट्रीग्जवर जाहिरात फलक लावण्याचा सपाटा सुरू आहे. चक्क दिशादर्शक फलकावर जाहिराती लावण्यात आल्याचे निदर्शनास आले. त्यामुळे मनपाकडून हे फलक हटविण्याची कारवाई करण्यात आली.
जाहिरात फलकांवर बंदी घातल्याने महापालिकेने काढलेल्या निविदेला प्रतिसाद मिळाला नाही. त्यामुळे काही जाहिरातदार अनधिकृतपणे जाहिरात फलक लावत असल्याचे निदर्शनास आले. जाहिरात फलक लावण्यात येऊ नयेत, अशी सूचना करूनही दुर्लक्ष करण्यात आले. गँट्रीग्ज व कॅन्टीलिव्हर फलकांवर जाहिरात लावण्यासाठी कंत्राट देण्यात आले होते. पण या कंत्राटाची मुदत संपली आहे. तरीदेखील काही ठिकाणी फलक लावण्यात आले असल्याचे निदर्शनास आले. काही ठिकाणी गँट्रीग्जवर निम्मी जाहिरात व निम्म्या फलकावर दिशादर्शक माहिती लावली होती. पण काही ठिकाणी दिशादर्शक फलकावर पूर्णपणे जाहिरात लावण्यात आल्याचे आढळून आले. त्यामुळे अनधिकृत जाहिरात फलक हटविण्याची सूचना बजावण्यात आली होती. त्यानुसार महापालिकेच्या महसूल विभाग व अतिक्रमण निर्मूलन पथकाने अनधिकृत जाहिरात फलक हटविण्याची कारवाई मंगळवारी राबविली. खानापूर रोड तसेच काँग्रेस रोड अशा विविध ठिकाणी असलेले जाहिरात फलक हटविण्यात आले. मनपाचे महसूल निरीक्षक मल्लिकार्जुन गुंडपण्णवर यांच्या नेतृत्वाखाली ही कारवाई करण्यात आली.