प्रतिनिधी / बेळगाव
महापालिकेने यंदा 50 कोटीची घरपट्टी वसूल करण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. एप्रिल अखेरपर्यंत 5 टक्के सवलतीची मुदत देण्यात आल्याने इमारतधारकांनी घरपट्टी भरण्यासाठी धावपळ केली होती. त्यामुळे 50 कोटीपैकी आतापर्यंत 12 कोटी 50 लाखांची घरपट्टी जमा झाली आहे. पण सवलतीच्या मुदतीत 30 जूनपर्यंत वाढ करण्यात आल्याने घरपट्टी भरण्यास थंडा प्रतिसाद मिळत आहे.
महानगरपालिकेने मागील वषी 45 कोटी घरपट्टी वसुलीचे उद्दिष्ट ठेवले होते. यापैकी 41 कोटी घरपट्टी वसूल करण्याचे उद्दिष्ट पूर्ण केले आहे. मात्र, मार्चअखेर शहरात कोरोनाचा शिरकाव झाल्याने घरपट्टी वसुली मोहिमेला ब्रेक लागला आहे. त्यामुळे महापालिकेला 100 टक्के घरपट्टी वसुली करण्यात यश आले नाही. 2021-22 या आर्थिक वर्षात 50 कोटी घरपट्टी वसूल करण्याचा प्रस्ताव आहे. हे उद्दिष्ट पूर्ण करण्यात कोरोनाचा अडथळा निर्माण झाला आहे. एप्रिल महिन्यात घरपट्टी भरणाऱयांना 5 टक्के सवलत देण्यात येते. पण लॉकडाऊनमुळे नागरिकांना घरपट्टी भरता आली नसल्याने सवलतीच्या मुदतीत दि. 30 जूनपर्यंत वाढ देण्यात आली आहे. त्यामुळे नागरिकांनी घरपट्टी भरण्यास धावपळ चालविली होती. पण कोरोनाबाधितांचा आकडा वाढत असल्याने क्लोजडाऊन करण्यात आले होते. त्यामुळे केवळ दुपारी 12 वाजेपर्यंत कर भरण्यासाठी बेळगाव-वन कार्यालय सुरू होते. त्यामुळे महानगरपालिकेच्या खजिन्यात आतापर्यंत 12 कोटी 50 लाखांची घरपट्टी जमा झाली आहे. पाच टक्के सवलतीच्या मुदतीत वाढ करण्यात आली असून, 30 जूनपर्यंत घरपट्टी भरण्याची मुभा आहे. सध्या शहरात लॉकडाऊन असल्याने बेळगाव-वन कार्यालयाचे कामकाज बंद ठेवण्यात आले आहे. त्यामुळे कर भरण्याचे पूर्णपणे ठप्प झाले आहे. पाच टक्के सवलतीमध्ये वाढ करण्यात आल्याने घरपट्टी भरण्यासाठी नागरिक प्रयत्न करीत आहेत. पण बेळगाव-वन कार्यालय बंद आहे. त्यामुळे केवळ ऑनलाईन घरपट्टी भरणा करीत आहेत. घरपट्टी भरण्यास सर्वसामान्य नागरिकांना मुदत मिळाली असली तरी मनपाच्या खजिन्यात जमा होणारी रक्कम घटली आहे.