मेक इन इंडियाअंतर्गत उत्पादनावर कंपनी देणार भर
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
लक्झरी कारच्या क्षेत्रामध्ये नाव कमावलेल्या मर्सिडिझ-बेंझ इंडियाने भारतात एएमजी आधारीत वाहनांची निर्मिती करण्याचे ठरवले आहे. यासंदर्भातला आराखडा लवकरच अंतिम केला जाणार असल्याचे कंपनीच्या सूत्रांकडून सांगण्यात येते.
मेक इन इंडियाला प्रोत्साहन देण्यासाठी सरकारनेही पावले उचलली असून या अंतर्गतच आता परदेशातील कंपन्या भारतात बस्तान बसवू पाहात आहेत. मर्सिडिझ कंपनी येणाऱया काळात मेड इन इंडियाच्या मोहिमेअंतर्गत एएमजी जी एलसी 43 4 मॅटिक कुप या मॉडेल गाडीचे उत्पादन घेणार असल्याचे समजते. कंपनीच्या स्पोर्ट्स युटिलीटी व्हेईकल, सुव्ह कुप्स आणि स्पोर्ट्स गटातील मोटारी भारतामध्ये उपलब्ध आहेत. एएमजी आधारित वाहने भारतात 2010 मध्येच दाखल करण्यात आली आहेत. सध्याला या प्रणालीवर आधारीत गाडय़ा आयात केल्या जातात. येणाऱया काळात या प्रणालीवरील वाहनांची निर्मिती भारतामध्येच केली जाणार आहे. त्या संदर्भात आराखडा आखण्यात आला असून लवकरच निर्मितीच्या कार्यवाहीला वेग दिला जाणार आहे.
एएमजीचे कार्यस्वरूप
एएमजी हा मर्सिडिझचा उपब्रँड आहे. उच्च कार्यक्षमतेच्या कार्स या प्रणालीअंतर्गत खास तयार केल्या जातात. या स्वतंत्र निर्मिती कार्यात 2 हजार 900 कर्मचारी कार्यरत असून हॅन्स वेर्नर ऑप्रेच व इराड मेल्चर हे संस्थापक आहेत. याचे मुख्यालय जर्मनीतील अफाल्टबाक येथे आहे.