शहर समितीच्या बैठकीत निर्धार : न्याय हक्कांसाठी मराठी भाषिकांनी सहभागी होण्याचे आवाहन
प्रतिनिधी /बेळगाव
मराठी भाषिकांच्या न्याय हक्कासाठी 25 ऑक्टोबर रोजी भव्य महामोर्चा काढण्यात येणार आहे. याचसोबत 1 नोव्हेंबर रोजी काळय़ा दिनानिमित्त सायकल फेरी होणार असून, आता यापुढे जिल्हा प्रशासनाची परवानगी न घेता विभागवार काम करण्यास सुरुवात करावी. महामोर्चा व सायकल फेरीमधून मराठी भाषिकांची ताकद दाखवून देण्याचा निर्धार शहर म. ए. समितीच्या बैठकीत व्यक्त करण्यात आला.
रामलिंगखिंड गल्ली येथील रंगुबाई भोसले पॅलेस येथे झालेल्या बैठकीत कार्यकर्त्यांनी आपली मते मांडली. रणजित चव्हाण पाटील यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. यत्या 1 नोव्हेंबर या काळय़ादिनी आपला निषेध नोंदविण्यासाठी सायकल, दुचाकीवरून सहभागी व्हायचे आहे. जिल्हा प्रशासनाने परवानगी दिली नाही तरी यावषी सायकल फेरी काढणारच, असा इशारा कार्यकर्त्यांनी दिला. तसेच 25 ऑक्टोबर रोजी होणाऱया महामोर्चामध्ये कन्नड, इंग्रजीसह मराठी भाषेत फलक, अनधिकृत लालपिवळा ध्वज हटविणे असे मुद्दे असणार आहेत. आपल्या न्याय हक्कांसाठी मराठी भाषिकांनी या महामोर्चामध्ये सहभाग घ्यावा, असे रणजित हावळाण्णाचे यांनी सांगितले.
मदन बामणे यांनी नूतन पदाधिकाऱयांच्या नावांची निवड करावी, असे सांगून भगव्या ध्वजाचा प्रश्न लावून धरण्याची मागणी केली. नितीन खन्नूकर, महादेव पाटील, युवा समितीचे अध्यक्ष शुभम शेळके यांनी आपली मनोगते व्यक्त केली. मालोजी अष्टेकर यांनी शहर समितीचा विस्तार करून युवक कार्यकर्त्यांना सामावून घेणार असल्याचे सांगितले.
यावेळी अध्यक्ष दीपक दळवी, नगरसेवक शिवाजी मंडोळकर, बी. ओ. येतोजी, प्रकाश मरगाळे, अमर येळ्ळूरकर, माजी नगरसेवक किरण परब, राकेश पलंगे, दिनेश रावळ, विनायक गुंजटकर यांच्यासह कार्यकर्ते मोठय़ा संख्येने उपस्थित होते.