प्रतिनिधी/ रत्नागिरी
रत्नागिरी, नवी मुंबई व पालघर या 3 जिल्हय़ांमधून गोळा केलेल्या नमुन्यांमध्ये डेल्टा प्लस व्हेरिएंटचे 7 रूग्ण आढळले आहेत. दरम्यान किती ठिकाणी हा विषाणू पसरला आहे, हे पडताळून पाहण्यासाठी नमुने तपासणीसाठी पाठवल्याचे वैद्यकीय अधिकाऱयांमधून सांगण्यात आले. धक्कादायक बाब म्हणजे यात रत्नागिरी जिल्हय़ातील एकाच तालुक्यातील 5 रूग्णांचा समावेश असल्याचे खात्रीदायक वृत्त असले तरी जिल्हा प्रशासनाने याला दुजोरा दिलेला नाही. या बाबत माहिती घेणे, पडताळणीचे काम सुरू असून लवकरच वस्तूस्थिती सांगण्यात येईल, अशी माहिती जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा यांनी ‘तरूण भारत’शी बोलताना दिली.
एका वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार, पश्चिम महाराष्ट्रात विशेषतः कोल्हापूर, सिंधुदुर्ग, रायगड, रत्नागिरी, सातारा व सांगलीमध्ये कोविड-19 रूग्णांमध्ये सातत्याने वाढ होत असल्याचे दिसत आहे. डेल्टा प्लसचे 7 पैकी 5 रूग्ण हे रत्नागिरी जिल्हय़ात आढळून आले आहेत. 10 जून रोजी रत्नागिरी जिल्हय़ाचा पॉझिटिव्हीटी दर 13.7 टक्के होता. त्यावेळी राज्याचा दर हा 5.8 होता. रत्नागिरीत कोरोनाचे 6 हजार 553 सक्रिय रूग्ण आढळले आहेत. रत्नागिरी जिल्हय़ाचा समावेश महाराष्ट्रात सर्वाधिक रूग्ण आढळणाऱया जिल्हय़ांमध्ये झाला आहे. रत्नागिरी जिल्हय़ात 5 डेल्टा प्लस रूग्ण आढळल्याचे सांगितले जात आहे. या पार्श्वभूमीवर आरोग्य विभागासह जिल्हा प्रशासन अलर्ट झाले आहे. मात्र या बाबत कोणतीही माहिती, वस्तूस्थिती प्रशासनाकडून दिली जात नाही आहे.
पडताळणीनंतर योग्य माहिती देणार
रत्नागिरी जिल्हय़ात तालुक्यातील एकाच वाडीतील 5 रूग्ण डेल्टा प्लसचे आढळल्याची माहिती आरोग्य अधिकारी मान्य करत असले तरी जिल्हा प्रशासनाकडून अद्यापही या बाबत अधिकृत माहिती दिली गेली नाही. माहिती घेवून सांगण्यात येईल. लक्षणे दिसून आली आहेत. पडताळणी झाल्यानंतर योग्य ती माहिती दिली जाईल, असे जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा यांनी सांगितले.
अद्यापही कन्फर्म नाही ः डॉ. लहाने
रत्नागिरी जिल्हय़ात 5 रूग्ण डेल्टा प्लसचे रूग्ण आढळून आले आहेत का, या बाबत ‘तरूण भारत’ने दूरध्वनीव्दारे विचारणा केली असता अद्यापही कन्फर्म नसल्याचे वैद्यकीय शिक्षण व संशोधन संचालनालयाचे (डीएमईआर) संचालक डॉ. तात्याराव लहाने यांनी सांगितले.
डेल्टा प्लस आहे तरी काय?
भारतात प्रथम आढळून आलेल्या डेल्टा म्हणजेच बी.1.617.2 या करोना विषाणू उत्परिवर्तनात आणखी उत्परिवर्तन घडून डेल्टा प्लस हा नवा विषाणूचा प्रकार तयार झाला आहे. डेल्टा प्लस अर्थात एराय. 1 हा कोरोनाचा विषाणू भारतात सध्या कमी प्रमाणात आहे. त्यामुळे त्याची धास्ती बाळगण्याचे कारण नाही, असे शास्त्रज्ञांनी म्हटले आहे. या नव्या प्रकारामुळे कोरोनाची लागण कितपत तीव्र असू शकते, हे अद्याप स्पष्ट झाले नसले तरी, हा प्रकार मोनोक्लोनल प्रतिपिंड मिश्रण या कोरोनावरील उपचारांना दाद देत नाही. भारतामध्ये अलीकडे याच उपचारपद्धतीला मान्यता देण्यात आली आहे.
दिल्लीतील सीएसआयआर-इन्स्टिटय़ुट ऑफ जिनोमिक्स ऍन्ड इंटिग्रेटिव्ह बायोलॉजी (आयजीआयबी) संस्थेचे शास्त्रज्ञ यांनी या बाबत ट्वीट केले आहे. कोरोनाना हा नवा विषाणू के 417 एन उत्परिवर्तनातून तयार झाला आहे, असे त्यांनी म्हटले आहे. नवे उत्परिवर्तन हे सार्स-कोव्ही-2 च्या स्पाईक प्रोटीनमधील बदलाने झाले आहे. हे प्रथिन विषाणूला मानवी पेशीत शिरकाव करण्यासाठी मदत करते. ‘पब्लिक हेल्थ इंग्लंड’ने दिलेल्या माहितीनुसार, डेल्टामध्ये (बी.1.617.2) के 417 एन उत्परिवर्तन झालेले 63 जिनोम आतापर्यंत दिसले आहेत.