प्रतिनिधी / सातारा :
महाविद्यालयीन युवतींना स्वसंरक्षणाचे धडे देऊन स्वावलंबी करण्याबरोबरच त्यांच्यात आत्मविश्वास निर्माण करण्यात सातारा पोलीस दल यशस्वी झाले आहे. महिला सुरक्षा प्रकल्पाचे हे सातारा मॉडेल राज्यात राबविण्यासाठी प्रयत्न करू, असा विश्वास गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांनी व्यक्त केला.
अलंकार हॉलमध्ये महिला सुरक्षा पथदर्शी प्रकल्पांतर्गत ज्या शाळा व महाविद्यालयीन युवती व महिलांनी स्वसंरक्षण प्रशिक्षण घेतले त्यांचे प्रात्यक्षिक आणि प्रशस्तीपत्रक वितरण कार्यक्रमात मंत्री देसाई बोलत होते. यावेळी पोलीस अधीक्षक अजयकुमार बन्सल, आंचल दलाल यांची प्रमुख उपस्थिती होती.
देसाई म्हणाले, आलेल्या संकटाचा सामना करण्यासाठी महिला सक्षम असणे ही काळाजी गरज आहे. माझी संकल्पना पोलीस दलाने सुयोग्य पद्धतीने राबविली. त्याचे प्रात्यक्षिक बघताना विशेष आनंद होत आहे. पोलीस अधीक्षक बन्सल यांनी कार्यक्रम राबविण्यामागची भूमिका विशद केली. कला व वाणिज्य सयाजीराव महाविद्यालय, ढवळे कॉलेज कन्याशाळा, यशवंतराव चव्हाण आदी महाविद्यालयातील विद्यार्थीनींनी प्रात्यक्षिक दाखवले.