आमदार रवी नाईक यांचे उद्गार : बेतोडा-फोंडा येथे भव्य महिला मेळावा
प्रतिनिधी /फोंडा
स्त्री ही मुळातच सर्जनशील व संवेदनशील असते. तिला पुढे येण्यासाठी योग्य संधी व प्रोत्साहन मिळाले पाहिजे. राजकारणात महिलांचा केवळ मतांसाठी वापर न होता, तिला ग्रामपंचायत, नगरपालिकेवर प्रतिनिधित्त्व करण्याची संधी मिळाली पाहिजे. राज्यातील सर्व चाळीसही आमदारांनी महिला सशक्तीकरणासाठी सकारात्मक विचार करण्याचे आवाहन फोंडय़ाचे आमदार व माजी मुख्यमंत्री रवी नाईक यांनी केले आहे.
अखिल गोवा महिला फेडरेशनतर्फे बेतोडा-फोंडा येथील सनग्रेस गार्डनमध्ये आयोजित केलेल्या अखिल गोवा महिला मेळाव्यात आमदार रवी नाईक प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. रविवारी दुपारी झालेल्या या मेळाव्याचे त्यांच्याहस्ते उद्घाटन करण्यात आले.
लेखिका व चित्रपट निर्मात्या ज्योती कुंकळय़ेकर, स्त्रीरोगतज्ञ डॉ. रेवा दुभाषी, फर्मागुडी येथील पीईएस रवी नाईक महाविद्यालयाच्या प्राध्यापिका डॉ. कमलादेवी कुंकळय़ेकर, पीईएस फार्मसी महाविद्यालयाच्या डॉ. सेलिना नाझारेथ तसेच नगरसेवक रितेश नाईक, आनंद नाईक, गोमंतक भंडारी समाजाचे अध्यक्ष अशोक नाईक, कुर्टीचे पंचसदस्य दादी नाईक, महिला फेडरेशनच्या अध्यक्ष अचला वेरेकर व सत्कारमूर्ती सुहासिनी विठ्ठल नाईक यांची व्यासपिठावर उपस्थिती होती.
महिलांच्या आरोग्याकडे लक्ष द्यावे
महिलांची कुटुंबामध्ये महत्त्वाची भूमिका असल्याने तिच्या आरोग्याकडे पुरुषांनी लक्ष देण्याची गरज रवी नाईक यांनी व्यक्त केली. महिला सशक्तीकरणावर आज सर्वत्र बोलले जाते. पण प्रत्यक्षात तिला अधिकार देण्याची वेळ येते, तेव्हा पुरुषी अहंकार जागा होतो. महिलांनीही आपल्यातील हा न्यूनगंड बाजूला ठेऊन आरक्षण व इतर अधिकारांचा वापर करुन घेत, स्वतःला सिद्ध करण्याचे आवाहन त्यांनी केले.
महिलांनी चांगल्या-वाईट गोष्टींचे भान ठेवावे
गोव्यातील महिला जागृत असून काही गोष्टींची तिला जाणीव व्हायला पाहिजे. तिने नेहमीच चौकस बुद्धिने विचार करावा. चांगल्या व वाईट गोष्टींचे भान ठेवावे. स्वतःमधील कलागुणांचा आविष्कार घडवून जीवन अर्थपूर्ण बनविण्याचा सल्ला ज्योती कुंकळय़ेकर यांनी दिला.
फोंडय़ात महिलांसाठी रक्तपेढीची गरज
डॉ. रेवा दुभाषी यांनी महिलांना आरोग्याविषयी मार्गदर्शन करताना, चुकीच्या सल्ल्यांपासून दूर राहण्याचे आवाहन केले. पारंपरिक पद्धतीचे जेवण आरोग्यासाठी उत्तम असल्याचे सांगितले. प्रसुतीच्यावेळी फोंडय़ातील महिलांना रक्ताचा तुटवडा जाणवतो. यासाठी फोंडय़ातील उपजिल्हा इस्पितळात स्वतंत्र रक्तपेढी विभाग होणे गरजेचे आहे. आमदार रवी नाईक यांनी त्यात विशेष लक्ष घालण्याची सूचनाही त्यांनी केली.
महिलांना कुटुंबाकडून मिळतेय प्रोत्साहन
आजचा समाज हा पुरुषप्रधान असला तरी महिलांना तिच्या कुटुंबाकडून प्रोत्साहन व पाठिंबा मिळतो, ही सकारात्मक बाब आहे. स्त्रीयांनी आपल्या आवडीच्या क्षेत्रात पुढे येऊन आत्मनिर्भर होण्याची गरज डॉ. कमलादेवी कुंकळय़ेकर यांनी व्यक्त केली. संवेदनशिलतेला आवर घालून बुद्धिमत्तेवर भर देण्याचा सल्लाही त्यांनी दिला.
डॉ. नाझारेथ यांनी औषधांविषयी मार्गदर्शन करताना त्यातील चुकीच्या पद्धती सांगितल्या. बदलती जीवनशैली, मधुमेहाचे धोके, कुटुंब नियोजन व गर्भवती महिलांनी स्वतः व तिच्या कुटुंबाकडून कशा प्रकारे काळजी घ्यावी याविषयी मार्गदर्शन केले.
अचला वेरेकर यांनी स्वागत केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अंबिशा प्रभू व उर्जा नाडकर्णी यांनी तर आरती मुंडये यांनी आभार मानले. मेळाव्याला मोठय़ासंख्येने महिला उपस्थित होत्या. यावेळी महिलांसाठी विविध स्पर्धा व मनोरंजनाचे कार्यक्रम आयोजित करण्यात आले.
सुहासिनी विठ्ठल नाईक यांचा सन्मान
लोककला व सामाजिक क्षेत्रातील योगदानाबद्दल सौ. सुहासिनी विठ्ठल नाईक यांचा आमदार रवी नाईक यांच्याहस्ते सन्मान करण्यात आला. महिलांचे सशक्तीकरण व त्यांना व्यासपीठ मिळवून देण्यासाठी आमदार रवी नाईक यांचे महत्त्वपूर्ण योगदान असल्याचे त्यांनी आपल्या मनोगतात सांगितले.