वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
भारताचे माजी हॉकीपटू व प्रशिक्षक एमके कौशिक यांना कोरोनाची लागण झाली असून येथील एका नर्सिंग होममध्ये त्यांना दाखल करण्यात आले आहे. त्यांच्या ऑक्सिजनचा स्तर सारखा कमी-जास्त होत असल्याचे त्यांच्या कुटुंबियांनी सांगितले.
66 वर्षीय कौशिक हे 1980 च्या मॉस्को ऑलिम्पिकमध्ये सुवर्ण मिळविणाऱया भारतीय संघाचे सदस्य आहेत. ‘त्यांना कोरोनाची लागण झाली असून त्यांना शहरातील इस्पितळात दाखल करण्यात आले आहे,’ असे त्यांचा मुलगा एहसानने सांगितले. ‘17 एप्रिल रोजी त्यांना सर्वप्रथम लक्षणे दिसून आली. पण आरटीपीसीआर व आरएटी चाचणी निगेटिव्ह आली होती. त्यानंतर 24 एप्रिल रोजी त्यांच्या छातीचे सीटी स्कॅन करण्यात आले आणि कोव्हिडमुळे न्युमोनिया झाल्याचे त्यात स्पष्ट झाले. तेव्हापासून त्यांना हॉस्पिटलमध्ये ठेवण्यात आले आहे. स्थिरही नाही आणि गंभीरही नाही, अशी त्यांची सध्याची स्थिती आहे. रात्रीच्या वेळी त्यांच्या ऑक्सिजनचा स्तर एकदम खालावतो, हीच गंभीर बाब बनली आहे,’ असेही एहसानने सांगितले. त्यांच्या पत्नीलाही लागण झाली असून याच हॉस्पिटलमध्ये त्यांच्यावरही उपचार सुरू आहेत. त्यांची प्रकृती सुधारली असून या आठवडय़ात त्यांना डिस्चार्जही देण्यात येणार आहे.
कौशिक यांच्या मार्गदर्शनाखाली भारताने 1998 च्या बँकॉक आशियाई क्रीडा स्पर्धेत सुवर्णपदक पटकावले होते. याशिवाय 2006 मध्ये त्यांच्या मार्गदर्शनाखाली महिला संघानेही दोहा आशियाई स्पर्धेत कांस्यपदक जिंकले होते. 1998 मध्ये त्यांना अर्जुन पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते तर 2002 मध्ये त्यांना द्रोणाचार्य पुरस्कार देण्यात आला होता.