वसीम शेख / कुडाळ :
पाचगणी येथील प्रसिद्ध संगीतकार सागर भिलारकर वेगवेगळी 25 प्रकारची वाद्य वाजवतात तसेच घरामध्येच नवनवीन गाणी तयार करणे, त्याला चाल लावणे असे अनेक प्रयोग करतात. त्यांच्या घरामध्ये 10 वर्षांपासून जिमी नावाची एक पाळीव कुत्री आहे. विशेष म्हणजे सागर यांचा रियाज ऐकून आता जिमी सुद्धा त्यांच्या सुरात सूर मिसळून गाणी गाते.
सागर हे घरात ज्यावेळी गाणी गातात, त्यावेळी जिमी देखील त्यांच्या सुरात सूर मिसळून गाते. ज्या प्रमाणे सागर गाण्यातील चढ उतार घेत असतात, त्याचप्रमाणे जिमी सुद्धा आवाजात वेगवेगळे चढ उतार घेते. मुक्या प्राण्यांना देखील गाण्यातील भाव समजतात आणि व्यक्त करावे वाटतात हे जिमीचे गाणे ऐकून पाहायला मिळते.
गेली 10 वर्षे जिमी सागर यांच्याकडे आहे. अगदी घरातल्या एका सदस्याप्रमाणेच तिचा घरात वावर असतो. कुत्रे रडले की आज ही अशुभ मानले जाते परंतु, जिमीच्या गायनाच्या या अनोख्या अंदाजाने कुत्र्यालाही गाता येते आणि त्यांच्याही भावना व्यक्त करण्याच्या वेगवेगळ्या पद्धती असतात हे दिसून येते.