देवीचा कोप होण्याची घातली भीती, नातेवाईकांची पोलिसांत धाव
प्रतिनिधी / मिरज
विवाहाप्रित्यर्थ आयोजित देवीच्या गोंधळ कार्यक्रमात घरच्या मुलीला पूजेचा अधिकार दिल्याने गोंधळ्याने भर मंडपात पाहूण्यांना शाप दिल्याचा प्रकार शहरातील उदगांव वेस, माळी गल्ली येथे घडला. तुमच्या पोटी मुलगा नाही, त्यामुळे तुमचे जीवन व्यर्थ आहे. मुलीला पूजेचा अधिकार दिल्याने देवीचा तुमच्यावर कोप होईल, अशी शापवाणीही या गोंधळ्याने दिली. याबाबत संबंधित मुलीच्या नातेवाईकांनी पोलिसांत धाव घेतली असून, समाजात अंधश्रध्दा पसरवून नातेवाईकांना धमकी देणाऱ्या गोंधळ्या विरुध्द शहर पोलिसात तक्रार दिली आहे.
एकीकडे समाजात मुली आणि महिलांना पुरूषांबरोबर समान हक्क मिळाले असताना आजही महिलांविषयी बुरसटलेल्या कल्पना बाळगणारे काही सनातनी आहेत. पुरूषी वर्चस्वाच्या रुढी परंपरांना ते अद्यापही कवटाळून बसले आहेत. त्यामुळे मुलींना दिले जाणारे अधिकार त्यांना मान्य नाहीत. मुलींना गौण लेखण्याचा असाच एक प्रसंग मिरजेत विवाहनिमित्त आयोजित केलेल्या गोंधळ कार्यक्रमात घडला.
शहरात एका विवाहानंतर गोंधळाचा कार्यक्रम आयोजित केला होता. त्याकरीता ब्राम्हणपुरीतील एका गोंधळ्याला पाचारण करण्यात आले होते. सदर गोंधळ्याला तीन हजार रुपयांचे मानधनही देण्यात आले होते.
गोंधळविधीची पूजा करताना नवरा-नवरी आणि दिवटे म्हणून तीन मुलांबरोबर एका मुलीलाही पुजेकरीता बसविले होते. मात्र, गोंधळ्याने मुलीला पुजेस बसण्याबद्दल आक्षेप घेतला. धर्मशास्त्राप्रमाणे पूजेसाठी मुलींना अधिकार नाही. मुलींचे ठिकाण हे चुलीपुढे असते. तुम्हाला मुलगा नसल्याने तुमचा जन्म व्यर्थ आहे, असे विधान त्याने केले. तुम्ही मुलीस दिवटे म्हणून उभा करून धर्माचे नियम मोडले आहेत. मुलगी ही धर्मशास्त्रानुसार दुय्यम असल्यामुळे हा गोंधळ विधी धर्मसंकेताविरूध्द आहे, असे सांगत त्याने हा विधी करण्यास नकार दिला.
अखेर नातेवाईकांच्या विनंती नंतर विधी पूर्ण केला खरा. मात्र, जाण्यापूर्वी त्याने ‘तुम्ही मुलीच्या हातात दिवटी दिल्याने हा विधी तुम्हाला लाभणार नाही व देवीचा तुमच्यावर कोप होणार’ अशी शापवाणीही दिली. गोंधळ्याच्या या कृत्याने संतप्त झालेल्या नातेवाईकांनी अंधश्रध्दा निर्मुलन समितीबरोबर पोलिसातही धाव घेतली आहे.