उद्यमबाग पोलिसांची कारवाई, चोरटय़ाकडून तीन मोटारसायकली जप्त
प्रतिनिधी /बेळगाव
उद्यमबाग आणि अनगोळ परिसरात पार्किंग केलेल्या मोटारसायकली चोरी करणाऱया चोरटय़ाला उद्यमबाग पोलिसांनी अटक केली आहे. त्याच्याकडून तीन मोटारसायकली जप्त करण्यात आल्या आहेत.
मुज्जमील अमानुल्ला होनगेकर (वय 30, रा. राजहंस गल्ली, अनगोळ) असे त्या चोरटय़ाचे नाव आहे. मुज्जमील याने केएलई इंजिनिअरिंग कॉलेज आणि बेम्को येथे पार्किंग केलेल्या मोटारसायकलींची चोरी केली होती. उद्यमबाग पोलीस स्थानकात या प्रकरणी फिर्याद दाखल झाली होती. त्यानंतर पोलीस निरीक्षक धिरज शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली तपास करुन मुज्जमील याला अटक करण्यात आली आहे.
त्याच्याकडून दोन स्प्लँडर तसेच आणखी एक दुचाकी जप्त करण्यात आली आहे. त्यानंतर त्याच्यावर भा.दं.वि. 379 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला. पीएसआय राजश्री कदम, पोलीस हवालदार आय. एस. पाटील, कॉन्स्टेबल जगदीश हादीमनी यांनी या कारवाईत भाग घेतला होता.