वृत्तसंस्था/ लियॉन, फ्रान्स
गेल्या आठवडय़ात देश सोडून आलेल्या युक्रेनच्या डायना यास्त्रsम्स्काने तीन मॅचपॉईंट्स वाचवत येथे सुरू झालेल्या लियॉन डब्ल्यूटीए टेनिस स्पर्धेत रोमानियाच्या खेळाडूवर विजय मिळवित दुसरी फेरी गाठली, त्यावेळी ती भावूक झाली होती.
रशियाने युक्रेनवर आक्रमण करण्यापूर्वीच 21 वर्षीय डायनाला या स्पर्धेत वाईल्डकार्ड प्रवेश मिळाला होता. तिने रोमानियाच्या ऍना बॉग्डनवर अतिशय संघर्षपूर्ण लढतीत 3-6, 7-6 (9-7), 7-6 (9-7) अशी मात केली. तीन तासाहून अधिक वेळ ही लढत रंगली होती. चौथ्या मॅचपॉईंटवर विजयी गुण मिळविल्यानंतर भावनावश झालेली डायना मैदानात गुडघ्यावर बसून रडू लागली. नंतर बॉग्डनने तिला नेटजवळ आलिंगन देत अभिनंदन करताना धीर दिला. नंतर डायनाने आपला राष्ट्रध्वज खांद्याभोवती घेत चाहत्यांना अभिवादन केले, तेव्हाही तिच्या डोळय़ांत अश्रू दिसत होते.
‘यापूर्वी मी असा सामना कधीच खेळले नव्हते. मनावर खूप ताण होता या सामन्यावेळी. मी खूपच नर्व्हस होते आणि सामन्याकडे लक्ष केंद्रित करण्याचा प्रयत्न करताना एकेक गुणाचा विचार करीत होते. हे करणे खूपच कठीण होते, पण मी विजय मिळविण्यात यशस्वी ठरले याचा अभिमान वाटतो. खूप प्रेरित झाले होते मी या सामन्यावेळी,’ अशा भावना डायनाने नंतर व्यक्त केल्या. येथील स्पर्धेत 15 वर्षीय बहीण इव्हानासमवेत ती दुहेरीतही खेळत आहे. गेल्या आठवडय़ात युक्रकेनमध्ये असताना बॉम्ब हल्ल्यांनी जाग आल्यानंतर फ्रान्सपर्यंत केलेल्या प्रवासाची माहितीही तिने दिली. तिचे आईवडील युक्रेनमध्येच असून दोघी बहिणींनी त्यांचा निरोप घेऊन डॅन्यूबमार्गे बोटने रोमानियाला त्या रवाना झाल्या होत्या. एकेरीत तिची पुढील लढत स्पेनच्या क्रिस्टिना बुक्साशी होत आहे. तिने आजवर तीन स्पर्धा जिंकल्या आहेत. मात्र मे 2019 नंतर तिला एकही जेतेपद मिळविता आलेले नाही.