युक्रेनवर रशियाच्या हल्ल्यानंर अनेक देशांचे लोक पुतीन यांना युद्ध रोखण्याचे आवाहन करत आहेत. तसेच स्वतःच्या पद्धतीने युक्रेनला मदत देखील करत आहेत. आयर्लंडमध्ये राहणाऱया 8 वर्षीय मुलीने स्वतःकडे जमा सर्व रक्कम युक्रेनला देण्याचा निर्णय घेतला आहे.
सोशल मीडियावर मुलीकडून युक्रेनच्या मदतीसंबंधी एक पत्र लिहिण्यात आले असून ते व्हायरल होतेय. मुलीचे नाव आइरिस आहे. ‘प्रिय युक्रेन…माझे नाव आइरिस असून मी युद्धामुळे दुःखी असून मी रशियात राहत असून आयर्लंडमधील आहे. तुमच्यापैकी बहुतांश लोक चांगले असतील अशी मी आशा करते. मी माझ्यावतीने तुम्हा सर्व लोकांना स्वतःकडील सर्व रक्कम देऊ इच्छिते’ असे तिने पत्रात नमूद केले आहे.
अनेक क्षेत्रांचे लोक युक्रेनच्या मदतीसाठी सरसावले आहेत. युक्रेनियन वंशाची अमेरिकन अभिनेत्री मिला कुनिसने स्वतःचा पती एश्टन कुचरसोबत मिळून एक आठवडय़ापेक्षाही कमी काळात युक्रेनच्या मदतीसाठी 20 दशलक्ष डॉलर्स जमविले आहेत. त्यांनी गोफंडमी नावाने एक मोहीम सुरू केली आहे.
तर हॉलिवूड अभिनेता लियोनार्डो डिकॅप्रियोने देखील युक्रेनला मदत केली आहे. डिकॅप्रियाने 10 दशलक्ष डॉलर्स म्हणजेच भारतीय चलनात 70 कोटी रुपयांची मदत केली आहे. याचबरोबर जगातील अनेक संघटना युक्रेनसाठी सरसावल्या आहेत. युनिसेफ युएसए, इंटरनॅशनल मेडिकल कॉर्प्स, हार्ट टू हार्ट इंटरनॅशनल, मर्सी कॉर्प्स, वर्ल्ड व्हिजन, प्रोजेक्ट होप यांचा यात समावेश आहे.