वार्ताहर/दाभोळ
प्रेम विवाहानंतरही पतीपत्नीमध्ये विश्वासार्हता नसणे, व त्याचे पर्यवसान पत्नीला जाळण्यापर्यंत होणे याचे उदाहरण दापोली तालुक्यातील दाभोळ खाडी नजीक असणाऱया ओणी या गावामध्ये पहावयास मिळाले. यातील आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतले असून त्यांना न्यायालयीन कस्टडीत ठेवण्यात आले आहे. ओणी, मधली वाडी येथे रविवारी (दि.19) ही घटना घडली.
आरोपी शितेष विश्वनाथ ओणकर (वय 26) याने चारित्र्याच्या संशयावरून रहात्या घरी आपल्या पत्नीला अंगावर रॉकेल ओतून पेटवून दिले. यात पत्नी प्रेक्षणी ही 50 ते 55 टक्के भाजली असून जिल्हा उपरूग्णालयात तीच्यावर उपचार सुरू आहेत. या घटनेत शितेशची आई प्रतिभा विश्वनाथ ओणकर(45) ही देखिल सहभागी असल्याने शितेष व प्रतिभा यांना भारतीय दंड विधान 307, 498 अ, 323 या कलमांतर्गत अटक करण्यात आली आहे.
फिर्यादी आरोपिची पत्नी प्रेक्षणी हिने दिलेल्या फिर्यादीनुसार ह्या गुह्याची नोंद करण्यात आली आहे. या प्रकरणाचा अधिक तपास दाभोळ सागरी पोलिस ठाण्याचे पोलिस उपनिरीक्षक दिपक कदम करत आहेत.