शास्त्री नदीत मासेमारीसाठी केमिकलचा वापर
वार्ताहर / संगमेश्वर
संगमेश्वर तालुक्यातील शास्त्री नदीत नायरी ते कारभाटले दरम्यान गोडया पाण्यातील मासेमारी करण्यासाठी अज्ञाताकडून केमिकलचा वापर करण्यात आल्याने नदीत मृत माशांचा खच पडला आहे. त्यामुळे परिसरात दुर्गंधी पसरली आहे.
सह्याद्रीच्या पायथ्याशी असलेल्या कारभाटले ते नायरी या गावातून जाणाऱ्या नदीत मासेमारी करण्याच्या हेतूने अज्ञात इसमांनी केमिकलचा वापर केल्याने या दरम्यान मासे मरुन पडत आहेत. माशांच्या अंगावर पांढरे चट्टे पडल्याने व मासे मृत पडल्याने परिसरात दुर्गंधी पसरली आहे. मासे मरण्याचे प्रमाण कोंडउमरे ते हेदली पर्यंत आले असून या नदीतील पाण्याचा उपयोग पाळीव जनावरांसाठी होत असल्याने त्याचे परिणाम इतर पाण्यांवर होण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. दोषींवर कारवाई करण्यात यावी म्हणून ग्रामस्थांनी संगमेश्वर पोलिसांकडे धाव घेतली आहे.