प्रतिनिधी / खेड
शहरातील शिवाजीचौक येथील बिर्याणी कॅटरर्सचे दुकान फोडून १ लाख ३६ हजारांच्या रोकडसह मोबाईल असा १ लाख ४२ हजारांचा ऐवज लांबणाऱ्या चोरट्याच्या येथील पोलिसांनी अवघ्या १२ तासातच मुसक्या आवळल्या. बजहुल छोटू खान (३६, रा. उत्तरप्रदेश) असे चोरल्याचे नाव आहे. शुक्रवारी न्यायालयासमोर हजर करण्यात आले असता न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली.
शहरातील शिवाजी चौक येथे नबी मुशरफ खान यांचे बिर्याणीचे दुकान आहे. अज्ञात चोरट्याने दुकानाचे शटर फोडून १ लाख ३६ हजाराच्या रोकडसह मोबाईल लांबवत पलायन केले होते. याबाबत पोलीस स्थानकात तक्रार दिल्यानंतर अज्ञातावर गुन्हा दाखल करण्यात आला होता. पोलीस निरीक्षक सुवर्णा पत्की यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक सुजित गडदे यांनी तपासाला गती दिली. त्यानुसार संशयिताच्या मुसक्या आवळण्यासाठी पोलीस कर्मचारी अजय कडू व नदाफ यांचे एक पथक रवाना झाले होते. संशयित पनवेल येथे लपला असल्याची गोपनीय माहिती मिळाल्यानंतर पथकाने सापळा रचून त्यास जेरबंद केले. त्याच्याकडून रोकडसह मोबाईल हस्तगत करण्यात आला आहे. याबाबतचा अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक सुजित गडदे करत आहेत.