ऑनलाईन टीम / मुंबई :
शिवसेनेचे माजी आमदार हर्षवर्धन जाधव यांनी आज पुन्हा एकदा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेमध्ये प्रवेश केला आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या उपस्थितीत दादर येथील कृष्णकुंजवर त्यांनी मनसेचा झेंडा हाती घेतला आहे.
दरम्यान, हर्षवर्धन जाधव हे 2009 मध्ये मनसेच्या तिकिटावर विधानसभेत निवडून गेले होते. त्यानंतर त्यांनी मनसेला रामराम ठोकून शिवसेनेत प्रवेश केला होता. दरम्यान, मधल्या काळात अंतर्गत वादामुळं शिवसेनेतून बाहेर पडून त्यांनी स्वतःचा पक्ष काढला. तसंच, औरंगाबादमधून अपक्ष म्हणून लोकसभा निवडणूक लढवली. त्यात त्यांचा पराभव झाला खरा, मात्र त्यांनी तीन लाखांच्या जवळपास मतं घेतली.
पक्ष प्रवेशानंतर जाधव म्हणाले, मराठवाडय़ात आता जोमाने कामाला सुरुवात करणार आहे. तसेच शिवसेनेचे नेते चंद्रकांत खैरे यांच्यावर टिका करताना ते म्हणाले, चंद्रकांत खैरे हे पुन्हा कधीही आयुष्यात खासदार बनणार नाहीत.
हर्षवर्धन जाधव यांच्या बरोबर प्रकाश महाजन, शिवसेना लोकसभा सहसंपर्क प्रमुख सुहास दशरथे आणि शिवसेनेचे माजी जिल्हाप्रमुख प्रकाश कौडगे यांनी देखील मनसेत प्रवेश केला.