उडुपी जिल्हय़ात सर्वाधिक 204 रुग्ण : आतापर्यंतची रुग्णसंख्या 4,835 वर : 1688 जणांना डिस्चार्ज
प्रतिनिधी/ बेंगळूर
अडीच महिने लॉकडाऊन जारी करून देखील राज्यात कोरोना रुग्णवाढीचा आलेख चढताच आहे. महाराष्ट्र, दिल्ली, गुजरात, तामिळनाडू आदी राज्यातून कर्नाटकात येण्यास परवानगी देण्यात आल्यानंतर रुग्णवाढ दुप्पट झाली आहे. शुक्रवारी राज्यात तब्बल 515 नवे रुग्ण आढळून आले. त्यामध्ये महाराष्ट्रातून परतलेल्यांचा समावेश अधिक आहे. उडुपी जिल्हय़ातच 204 नव्या कोरोनाबाधितांची भर पडली असून या जिल्हय़ातील रुग्णसंख्या 768 वर पोहोचली आहे. तर राज्यातील रुग्णांचा आकडा 4,835 वर पोहोचला आहे.
कोरोनाबाधितांच्या संख्येत मोठय़ा प्रमाणात वाढ होत असल्याने आरोग्य खात्यापुढे आव्हान निर्माण झाले आहे. मागील 24 तासांत 515 नव्या संसर्गबाधितांची भर पडली असून त्यापैकी 482 जण आंतरराज्य प्रवास केलेले आहेत. त्यातही 472 जण महाराष्ट्रातून परतलेले आहेत. शुक्रवारी 83 जण कोरोनामुक्त झाले असून त्यांना इस्पितळातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. त्यामुळे संसर्गमुक्त झालेल्यांची संख्या 1,688 इतकी झाली आहे. सध्या राज्यात 3,088 जणांवर विविध इस्पितळांमध्ये उपचार सुरू आहेत. त्यापैकी 13 जण व्हेंटिलेटरवर आहेत. शुक्रवारी एकाही मृत्यूची नोंद झालेली नाही.
उडुपी जिल्हय़ात 204, यादगिरमध्ये 74, विजापूरमध्ये 53, गुलबर्ग्यात 42, बिदरमध्ये 39, बेळगाव जिल्हय़ात 36, मंडय़ा 13, बेंगळूर ग्रामीण 12, बेंगळूर शहर 10, मंगळूर 8, कारवार 7, हासन, चिक्कबळ्ळापूर, धारवाड जिल्हय़ांमध्ये प्रत्येकी 3, रामनगर जिल्हय़ात 2 तसेच बागलकोट आणि बळ्ळारी जिल्हय़ात प्रत्येकी 1 नवा रुग्ण आढळला आहे. तर हासनमध्ये 32, मंडय़ा जिल्हय़ातील 13, बेंगळूर शहर आणि गदगमधील 9, दावणगेरे 6, चिक्कमंगळूर, चित्रदुर्ग, चिक्कबळ्ळापूर आणि विजापूरमधील प्रत्येकी 3 तसेच धारवाड व गुलबर्गा जिल्हय़ातील प्रत्येकी एक रुग्ण संसर्गमुक्त झाल्याने डिस्चार्ज देण्यात आला आहे.
रुग्णसंख्येत उडुपी जिल्हा पहिल्या स्थानी
रुग्णसंख्येत उडुपी जिल्हा 768 रुग्णांसह राज्यात पहिल्या स्थानी आहे. तर गुलबर्गा जिल्हा 552 रुग्णांसह दुसऱया स्थानी, बेंगळूर शहर जिल्हा 434 रुग्ण संख्येसह तिसऱया स्थानी आहे. त्यापाठोपाठ यादगिर (373), रायचूर (356) यांचा क्रम लागतो.
13,627 स्वॅबची तपासणी
शुक्रवारी राज्यातील विविध विमानतळांवर 64 प्रवाशांची तपासणी करण्यात आली आहे. त्यातील विदेश प्रवास केलेल्या एकामध्ये कोरोना संसर्ग आढळला आहे. मागील 24 तासांत 13,627 स्वॅबची तपासणी करण्यात आली असून 12,797 जणांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत. तर 36,787 जणांना विलगीकरण कक्षात ठेवण्यात आले आहे, अशी माहिती आरोग्य खात्याने हेल्थ बुलेटिनद्वारे दिली आहे.