प्रतिनिधी /पणजी
राज्यात बुधवारी सायंकाळी काही भागात पावसाच्या मध्यम तथा हलक्या सरी कोसळल्या. हवामान खात्याने आज व दि. 9 एप्रिल रोजी पावसाची शक्यता व्यक्त केली आहे.
राज्यात मंगळवारी सायंकाळी जोरदार पावसाने झोडपले खरे, परंतु वेधशाळेत मात्र राज्यातील तीन ठिकाणी प्रत्येक 1 से. मी. एवढीच पावसाची नोंद झाली. पणजीत सुमारे पाऊण तास पाऊस झाला, मात्र 1 से. मी. एवढी देखील नोंद झालेली नाही. हवामान खात्याने आज दि. 7 रोजी राज्यात बहुंताश भागात पावसाची शक्यता व्यक्त केली आहे. बुधवारी राज्यात सर्वत्र ढगाळ हवामान होते. दुपारी दोन तास ऊन पडले. परंतु सायंकाळी 4 वा. पासून पुन्हा काळे ढग सर्वत्र दाटून आले. सत्तरीत केरी व आसपासच्या भागात पाऊस झाल्याचे वृत्त आहे. सांखळी व पणजीतही सायंकाळी पावसाच्या किंचित शिडकावा झाला. पेडणे तालुक्यातील काही भागात पावसाच्या हलक्या सरी कोसळल्या.
हवामान खात्याने येत्या दि. 9 एप्रिल रोजी पुन्हा एकदा राज्यातील काही भागात हलक्या तथा मध्यम स्वरुपाच्या पावसाची शक्यता व्यक्त केली आहे.