लक्ष्मीपूजनोत्सवानिमित्त बाजारपेठांमध्ये झगमगाट, आज धेंडलो पाडवो, गावोगावी होणार गुरांची पूजा
प्रतिनिधी /पणजी
अमाप उत्साहात आणि विविध माध्यमांद्वारे एकमेकांना शुभेच्छा देत तमाम गोमंतकीयांनी बुधवारी दीपोत्सव साजरा केला. पहाटे नरकासूर दहन केल्यानंतर अभ्यंगस्नानादी कार्यक्रम आटोपून आकाशकंदील लावण्यात आला. दारी झेंडू फुलांचे तोरण, दारात आकर्षक रांगोळी सजवून त्यावर पणत्यांची आरास करण्यात आली. त्यानंतर पोहय़ांच्या गोड-तिखट पदार्थांचा आस्वाद घेत लोकांनी दिव्यांचा मांगल्यरुपी सण असलेल्या दिवाळीचा उत्साह द्विगुणीत केला.
त्यानंतरचा संपूर्ण दिवस एकमेकांच्या घरी भेटी देणे, तसेच फोन, वॉटस्ऍप मेसेजीस यासारख्या विविध माध्यमांद्वारे एकमेकांना दिवाळीच्या शुभेच्छा व्यक्त करण्यात घालविण्यात आला. ग्रामीण भागात पोहे खाण्यासाठी एकमेकांच्या घरी भेट देण्याची प्रथा आजही कायम आहे. त्यावेळी प्रत्येक घरातील प्रमुख सुवासिनी दारी आलेल्या प्रत्येकाचे पाय धुवून सन्मानाने घरात प्रवेश देते. त्यानंतर पाटावर बसवून ओवाळणी करण्यात येते. नंतर पोह्याचे विविध गोड-धोड पदार्थ त्यांना खाण्यास देण्यात येतात.
हा कार्यक्रम झाल्यानंतर सायंकाळी प्रत्येकाने आपापल्या घरी लक्ष्मीपूजन केले. यंदा दिवाळीच्या दिवशीच लक्ष्मीपूजनोत्सही आहे. त्यानिमित्त व्यापारीवर्गाने आस्थापनात जय्यत तयारी करून मोठय़ा भक्तीभावाने लक्ष्मी पूजन केले. नव्या हिशेब वहीचेही हळद, कुंकू, गंध, फूल, अक्षता वाहून पूजन करण्यात आले. सर्व बाजारपेठा विद्युत रोषणाईच्या झगमगाटाने उजळून गेलेल्या पाहण्यास मिळाल्या. तसेच दुकानदार सुहास्यवदनाने प्रत्येक ग्राहक आणि दारी येणाऱया प्रत्येकास प्रसादरुपी चिरमुऱया, पेढे देत असल्याचे दिसून आले.
आज पाडवा
दरम्या आज कार्तिक शुद्ध प्रतिपदा म्हणजेच पाडवा सण साजरा करण्यात येणार आहे. या दिवशी ग्रामीण भागात गुरांची पूजा करण्यात येणार आहे. तसेच सायंकाळी गावात धेंडलो फिरविण्यात येणार आहे. हा धेंडलो फिरवताना, ’धे धेणलो, धेंणल्या पावस शेणलो’, हे पारंपरिक लोकगीत म्हटले जाते. पाडवा हा साडेतीन मुहूर्तांपैकी एक असल्यामुळे या दिवशी सोने, चांदीचे दागदागिने, वाहने, इलेक्ट्रॉनिक वस्तू, अन्य उपकरणे यांची खरेदी करण्याची प्रथा असून त्यामुळे बाजारपेठा ग्राहकांच्या गर्दीने फुलून गेलेल्या पाहावयास मिळणार आहेत.