प्रतिनिधी/ वास्को
राष्ट्रवादी काँग्रेसच्या वास्को कार्यालयाचे माजी केंद्रीय नागरी हवाई उड्डाणमंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते प्रफुल्ल पटेल यांच्या हस्ते मंगळवारी दुपारी उद्घाटन करण्यात आले. यावेळी पक्षाचे आमदार चर्चिल आलेमाव, प्रदेश अध्यक्ष जुझे फिलीप डिसोजा, अल्पसंख्यांक विभागाचे अध्यक्ष नझीर खान व कार्यकर्ते उपस्थित होते.
राष्ट्रवादी काँग्रेसचे वास्कोतील कार्यालय शहरातील एफ. एल. गोम्स मार्गावरील टिकळ मैदान संकुलात उघण्यात आलेले आहे. माजी केंद्रीय प्रफुल्ल पटेल तसेच आमदार चर्चिल आलेमाव यांचे प्रदेश अध्यक्ष जुझे फिलीप डिसोजा, नझीर खान व इतर कार्यकर्त्यांनी पुष्पगुच्छ देऊ स्वागत केले. प्रफुल्ल पटेल यांनी यावेळी वास्कोतील नेते व कार्यकर्त्यांनी पक्षाच्या भावी कार्यासाठी शुभेच्छा दिल्या.
काँग्रेसच्या नकारात्मक भुमीकेबाबत नाराजी
यावेळी पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नांना उत्तरे देताना प्रफुल्ल पटेल यांनी गोवा विधानसभेच्या मागच्या निवडणुकांवेळी घेतलेल्या भुमीकेबद्दल नाराजी व्यक्त केली. काँग्रेसने त्यावेळी नकारात्मक भुमीका घेतली होती याची आठवण त्यांनी करून दिली. गोव्यातील येणाऱया पालिका निवडणुकांबाबत गोव्यातील स्थानिक नेते योग्य निर्णय घेतील असे ते म्हणाले.
सहा वर्षांपूर्वी केंद्रीय नागरी हवाई उड्डाण मंत्रालयाचा पदभार सांभाळलेल्या प्रफुल्ल पटेल यांनी गोवा हे पर्यटन राज्य असल्याने आर्थिक दृष्टय़ा विचार करता हवाई सेवा खुली होणे गोव्यासाठी आवश्यक असल्याचे सांगितले. गोव्याची अर्थ व्यवस्था पर्यटन व्यवसायावर अवलंबून आहे. हा व्यवसाय थांबल्यास आर्थिक समस्यांचा परीणाम सहन करावा लागेल असे ते म्हणाले.