ईश्वरपूर नामकरणाचा विषय पुन्हा प्रलंबित : शिवसेना
इस्लामपूर / प्रतिनिधी
इस्लामपूर शहराच्या ईश्वरपूर नामकरणाबरोबर विकासकामांच्या विषयासाठी सोमवारी घेण्यात आलेली नगरपालिकेची सर्वसाधारण सभा कोरम अभावी रद्द करण्यात आली. या सभेस राष्ट्रवादीच्या सर्वच नगरसेवकांनी तर विकास आघाडीच्या पक्षप्रतोदांसह बहुतांशी नगरसेवकांनी दांडी मारली. सभागृहाची मुदत दि.३ जानेवारी रोजी संपणार असून त्याच्या अगोदर सभा घेण्यासाठी कायदेशीर बाबी तपासल्या जातील, असे नगराध्यक्ष निशिकांत पाटील यांनी घोषित केले. दरम्यान शिवसेनेचे गटनेते आनंदराव पवार यांनी दोन्ही गटांच्या नगरसेवकांवर आरोपांच्या फैरी झाडल्या.
नामकरणासाठी दि.१७ डिसेंबर रोजी खास विशेष सभा बोलावण्यात आली होती. या सभेवेळी शिवसेनेचे नगरसेवक शक्तीप्रदर्शन करीत सभागृहात दाखल झाले. त्या सभेलाही राष्ट्रवादी बरोबरच विकास आघाडीच्या नगरसेवकांनी अनुपस्थिती दाखवली. त्यावेळी ३२ पैकी शिवसेनेच्या पाच नगरसेवकांसह अवघे १० नगरसेवक उपस्थित होते. त्यामुळे कोरम अभावी सभा रद्द करुन या विषयासह इतर विषयांसाठी सोमवारी नगराध्यक्ष निशिकांत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली व मुख्याधिकारी वैभव साबळे यांच्या उपस्थितीत सभा बोलावली. मात्र या सभेसाठी शिवसेनेचे चार व विकास आघाडीचे नगराध्यक्षांसह चारनगरसेवक उपस्थित राहिल्याने पुन्हा सभा रद्द करावी लागली.
दरम्यान शिवसेनेचे गटनेते पवार अनुपस्थित नगरसेवकांवर गरजले. विकास “आघाडीचे काही नगरसेवक सर्वसाधारण सभेला उपस्थित राहिले नाहीत, हे योग्य नाही. राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेवकांना मी त्यांच्या घरी जावून आजच्या सभेला येण्याची विनंती केली. पण आज ही ते गैरहजर राहिले”. नामांतराला विकास आघाडी व राष्ट्रवादी नगरसेवक संगनमताने विरोध करीत असल्याचा आरोप पवार यांनी केला. या सभेदरम्यान पवार यांनी छ. शिवाजी महाराज उरुणासह वाळवा व अन्य गावात येवून गेल्याचे पुरावे मिळत आहेत. त्यावेळी इस्लामपूर गावाचे नाव उरण होते. परकीय हल्लेखोर ज्यावेळी आले. त्यावेळेला या भागात त्यांचा तळ होता, तेंव्हा पासून या शहराला इस्लामपूर नाव पडले. त्यामुळे ईश्वरपूर हे नामकरण होणे आवश्यक आहे.”
दिवंगत माजी नगराध्यक्षांचे फोटो अण्णासाहेब डांगे सभागृहात लावण्यात आले आहेत. यामध्ये नुकतेच निधन झालेले माजी नगराध्यक्ष विजयभाऊ पाटील व ॲड सुधीर पिसे यांचे फोटो सभागृहात लावण्यात आले. यावेळी फोटोंचे पूजन करण्यात आले. या दरम्यान हे दोन्ही नेते राष्ट्रवादीचे आहेत. या फोटोंचे अनावरण होताना राष्ट्रवादीचे नगरसेवक सभागृहात उपस्थित नसावेत, यासारखे दुर्दैव नाही, अशी खंत नगरसेवक वैभव पवार यांनी व्यक्त केली.