वार्ताहर/ लोणंद
अंदोरी (ता. खंडाळा) गावच्या हद्दीमध्ये असणाऱया रुई येथील प्रशांत रामचंद्र राणे यांचा 4 वर्षाचा मुलगा व अडीच वर्षाची मुलगी ही बहीण भाऊ असणारी लहान मुले शनिवारी सकाळ 12 वाजल्यापासुन बेपत्ता झाली आहेत. या घटनेची नोंद लोणंद पोलीस स्टेशनला करण्यात आली आहे. लोणंद पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन या दोन्ही मुलांचा शोध सुरु केला असुन या घटनेमुळे रुई व अंदोरी परिसरात खळबळ उडाली आहे.
या घटनेबाबत लोणंद पोलीस स्टेशनमधुन मिळालेली अधिक माहिती अशी की, अंदोरी गावच्या हद्दीमधील रुई येथील प्रशांत रामचंद्र राणे यांची आशिष राणे (वय 4) व ऐश्वर्या राणे (वय अडीच वर्ष) ही दोन लहान मुले शनिवारी सकाळी 11.30 वाजण्याच्या सुमारास नेहमीप्रमाणे खेळण्यासाठी घराबाहेर गेली होती. यावेळी प्रशांत राणे हे पत्नीसह शेतामध्ये गेले होते व त्यांच्या घरी त्यांच्या आई होत्या. खेळायला गेलेली मुले बराच वेळ झाले तरी घरी आली नाहीत म्हणुन राणे कुटुंबियांनी त्यांचा परिसरात शोध घेतला तरी दोन्ही मुले सापडली नाहीत. त्यानंतर स्थानिक ग्रामस्थांनी या घटनेची माहिती लोणंद पोलीस स्टेशनला दिली. या घटनेचे गांभीर्य ओळखुन लोणंदचे सहाय्यक पोलीस निरीक्षक विशाल वायकर व पोलीस उपनिरीक्षक गणेश माने यांनी सहकार्यासह घटनास्थळी धाव घेऊन ग्रामस्थांच्या सहकार्याने आशिष व ऐश्वर्याचा शोध सुरू केला आहे.
घराच्या जवळून साधारणतः 200 मीटर अंतरावरून कॅनॉल गेला असून महाबळेश्वर ट्रेकर्स घटनास्थळी दाखल झाले आहेत रात्री उशिरापर्यंत या लहान मुलांची शोधाशोध सुरू होती.