नैर्त्रुत्य रेल्वे विभाग देशात 23 व्या क्रमांकावर : डिसेंबरपर्यंत केवळ 40 टक्के विद्युतीकरण
प्रतिनिधी /बेळगाव
रेल्वेची गती वाढावी व कोळशाचा वापर कमी व्हावा, या उद्देशाने रेल्वे विभागाने देशभरातील रेल्वेमार्गांचे विद्युतीकरण करण्यास मागील 10 वर्षांपासून सुरुवात केली आहे. देशाच्या दक्षिणेकडील राज्यांचा विचार करता कर्नाटक रेल्वेमार्गांच्या विद्युतीकरणामध्ये सर्वात पिछाडीवर राहिले आहे. नैर्त्रुत्य रेल्वे विभाग विद्युतीकरणामध्ये देशात 23 व्या क्रमांकावर असल्याची माहिती उपलब्ध झाली आहे.
नैर्त्रुत्य रेल्वेअंतर्गत एकूण 3 हजार 603 किलोमीटरचा रेल्वेमार्ग असून यापैकी 3 हजार 37 कि.मी. कर्नाटकात तर उर्वरित महाराष्ट्र व गोव्यात आहे. 31 डिसेंबर 2021 पर्यंत फक्त 40 टक्के रेल्वेमार्गाचे विद्युतीकरण करण्यात आले होते. गोव्यात नैर्त्रुत्य रेल्वेचा 189 कि. मी. चा मार्ग असून त्याठिकाणी अद्याप विद्युतीकरण केलेले नाही. कर्नाटकच्या तुलनेत शेजारील आंध्रप्रदेश, तेलंगणा, तामिळनाडू व केरळ या राज्यांमध्ये विद्युतीकरण मोठय़ा प्रमाणात झाले आहे.
विद्युतीकरणची टक्केवारी
राज्य | विद्युतीकरण टक्केवारी | क्रमांक |
तेलंगणा | 88.68 | 11 |
आंध्रप्रदेश | 85.62 | 13 |
केरळ | 81.82 | 14 |
तामिळनाडू | 75.44 | 16 |
कर्नाटक | 42.49 | 23 |
सर्व मार्गांवरील विद्युतीकरणाचे काम डिसेंबर 2023 पर्यंत पूर्ण होईल
2016 साली 208 कि. मी. चे विद्युतीकरण म्हणजे एकूण आकडेवारीच्या 5 टक्के विद्युतीकरण झाले होते. सध्या 1400 कि. मी. चे काम पूर्ण झाले आहे. विद्युतीकरणाचे काम युद्धपातळीवर सुरू असून रेल विकास निगम, पॉवर ग्रीड कार्पोरेशन व इतर कंपन्यांच्या सहकार्याने सुरू आहे. 600 कि. मी. विद्युतीकरणाचे काम मार्च 2022 तर नैर्त्रुत्य रेल्वेच्या सर्व महत्त्वाच्या मार्गांवरील विद्युतीकरणाचे काम डिसेंबर 2023 पर्यंत पूर्ण होईल, अशी माहिती प्रसार माध्यमांना दिली.
– ई विजया (मुख्य जनसंपर्क अधिकारी, नैर्त्रुत्य रेल्वे)