प्रतिनिधी/ मडगाव
भाजपच्या व्हायबंट मडगाव पॅनलच्या उमेदवार रोनिता राजेंद्र आजगावकर यांनी शनिवारी प्रभाग 14 मधून आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. आपण प्रभाग 14 च्या व मडगावच्या कन्या असून या प्रभागाच्या व उर्वरित मडगाव शहराच्याही विकासासाठी आपण प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.
त्या उपमुख्यमंत्री बाबू आजगावकर यांची पुतणी, तर माजी नगराध्यक्ष राजेंद्र आजगावकर यांच्या कन्या आहेत. त्यांचा राजकीय वारसा आपल्याला लाभला असून त्यांच्याच मार्गावर चालून आपण समाजकार्य करणार आहे. पालिका निवडणुकीच्या माध्यमातून समाजाची सेवा करण्याची संधी आपणास प्राप्त झाली आहे, असे त्यांनी सांगितले.
विद्यमान उपमुख्यमंत्री बाबू आजगावकर हे मडगाव पालिकेचे माजी उपनगराध्यक्ष, तर राजेंद्र आजगावकर हे माजी नगराध्यक्ष आहेत. उपनगराध्यक्ष व नगराध्यक्ष म्हणून त्यांनी केलेले काम आपण जवळून पाहिले आहे. त्यांच्या पावलावर पाऊल टाकून आपणही प्रभाग 14 च्या व एकूणच मडगाव शहराच्या विकासासाठी प्रयत्न करणार आहे, असे त्यांनी सांगितले. यावेळी भाजपच्या मडगाव मंडळाचे अध्यक्ष रूपेश महात्मे, व्हायबंट मडगाव पॅनलचे प्रभाग 12 चे उमेदवार व भाजपचे युवा नेते शर्मद रायतूरकर, राजेंद्र आजगावकर, अश्रफ पंडियाल व रोनिता आजगावकर यांचे समर्थक उपस्थित होते.