वृत्तसंस्था/ दुबई
निर्धारित षटकातील रोमांचक टायनंतर सुपरओव्हरमध्ये देखील शेवटच्या चेंडूपर्यंत रंगलेल्या लढतीत रॉयल चॅलेंजर्स बेंगळूरने आयपीएल साखळी सामन्यात तुलनेने बलाढय़ मुंबई इंडियन्सला पराभवाची धूळ चारली.
सुपरओव्हरमध्ये शेवटच्या चेंडूवर एकेरी धाव आवश्यक असताना विराट कोहलीने बुमराहला चौकार फटकावत विजयावर शिक्कामोर्तब केले. सुपरओव्हरमध्ये मुंबई इंडियन्सने 1 बाद 7 धावा केल्या तर प्रत्युत्तरात आरसीबीने शेवटच्या चेंडूवर विजयाचे लक्ष्य गाठले. त्यापूर्वी, उभय संघातील निर्धारित षटकांची ही लढत रोमांचकरित्या टाय झाली होती. आरसीबीने 20 षटकात 3 बाद 201 धावा जमवल्या तर प्रत्युत्तरात मुंबईला देखील 5 गडय़ांच्या बदल्यात 201 धावांवरच थांबावे लागले होते.
सुपरओव्हरमध्ये मुंबईच्या डावात पहिल्या दोन चेंडूवर दोन एकेरी धावानंतर तिसरा चेंडू निर्धाव गेला. त्यानंतर चौथ्या चेंडूवर पोलार्डने चौकार वसूल केला तर पाचव्या चेंडूवर तो बाद झाला. शेवटच्या चेंडूवर हार्दिकने बायची एक धाव घेतली.
विराट सलामीला उतरला
विजयासाठी आरसीबीला 8 धावांची गरज असताना एबी डीव्हिलियर्ससह दस्तुरखुद्द आरसीबी कर्णधार विराट सलामीला उतरला. बुमराहच्या पहिल्या यॉर्कर चेंडूवर एबीडीला एकच धाव घेता आली. त्यानंतर डीप बॅकवर्ड स्क्वेअरकडे फटकावल्यानंतरही विराटला एकाच धावेवर समाधान मानावे लागले. तिसऱया चेंडूवर एबीडीला पंचांनी बाद ठरवले होते. पण, डीआरएसमध्ये तो बाद नसल्याचे स्पष्ट झाले.
चौथ्या चेंडूवर एबीडीच्या बॅटची कड घेऊन चौकार आरसीबीच्या खात्यात जमा झाला तर पाचव्या चेंडूवर आणखी एक एकेरी धाव घेतली गेल्यानंतर शेवटच्या चेंडूवर एक धाव आवश्यक होती. यावेळी विराटने विजयी चौकार फटकावल्यानंतर आरसीबीच्या गोटात विजयाची लहर उमटली.
निर्धारित षटकातील नाटय़
तत्पूर्वी, 20 षटकांच्या लढतीत शेवटच्या षटकात 19 धावांची गरज असताना इशान किशन व केरॉन पोलार्ड यांना पहिल्या दोन चेंडूंवर किशन व पोलार्ड यांना प्रत्येकी एक एकेरी धाव घेता आली.
उर्वरित 4 चेंडूत 17 धावांची गरज असताना किशनने सलग दोन षटकार खेचले व यामुळे 2 चेंडूत 5 धावा, असे नवे समीकरण होते. मात्र, स्लोअर वनवर किशनचा अंदाज चुकला आणि तो सीमारेषेवर झेल देत बाद झाला. शेवटच्या चेंडूवर 5 धावांची गरज असताना पोलार्डने चौकार खेचला व यामुळे हा सामना टाय झाला.
विजयासाठी 202 धावांचे आव्हान असताना कर्णधार रोहित शर्मा (8) व क्विन्टॉन डी कॉक (14) स्वस्तात बाद झाले. सुर्यकुमार यादव (0), हार्दिक पंडय़ा (15) परतले. पण, त्यानंतर इशान किशन व पोलार्ड यांनी धमाकेदार फलंदाजी साकारत हा सामना टाय केला होता.
एबी डीव्हिलियर्स (24 चेंडूत नाबाद 55), देवदत्त पडिक्कल (40 चेंडूत 54) व ऍरॉन फिंच (35 चेंडूत 52) यांनी तडफदार अर्धशतके झळकावल्यानंतर रॉयल चॅलेंजर्स बेंगळूरने मुंबई इंडियन्सविरुद्ध आयपीएल साखळी सामन्यात निर्धारित 20 षटकात 3 बाद 201 धावा जमवल्या. शिवम दुबेच्या 10 चेंडूतील जलद 27 धावाही महत्त्वाच्या ठरल्या.
मुंबई इंडियन्सने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीला पाचारण केल्यानंतर रॉयल चॅलेंजर्स बेंगळूरच्या सलामीवीरांनी याचा पुरेपूर लाभ घेतला. सलामीवीर देवदत्त पडिक्कल व ऍरॉन फिंच या दोघांनीही तडफदार अर्धशतके झळकावत 81 धावांची दमदार सलामी दिली. एकीकडे फिंचने 35 चेंडूत 7 चौकार, 1 षटकारासह 52 धावांची आतषबाजी केली तर दुसरीकडे, देवदत्त पडिक्कलने देखील 40 चेंडूत 54 धावा फटकावल्या. पडिक्कलच्या अर्धशतकी खेळीत 5 चौकार व 2 षटकारांचा समावेश राहिला.
मुंबई इंडियन्सतर्फे जलद गोलंदाज बोल्टनेच या दोन्ही सलामीवीरांना नंतर तंबूचा रस्ता दाखवला. प्रारंभी, डावातील 9 व्या षटकातील शेवटच्या चेंडूवर फिंच स्लोवर वनवर फसला. बॅकफूटवर जात एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने उत्तूंग फटका मारण्याच्या प्रयत्नात त्याने पोलार्डकडे झेल दिला. सीमारेषेच्या अगदी नजीक पोलार्डने उत्तम झेल टिपला.
दुसरा अर्धशतकवीर सलामी फलंदाज देवदत्त पडिक्कल देखील बोल्टचाच बळी ठरला. वाईड लाँगऑन बाऊन्ड्रीच्या दिशेने फटका मारण्याच्या प्रयत्नात तो झेलबाद झाला. योगायोग म्हणजे हा झेल देखील पोलार्डनेच टिपला. तिसऱया स्थानावरील कर्णधार विराट कोहलीचे स्वस्तात बाद होणे मात्र रॉयल चॅलेंजर्स बेंगळूरच्या गोटात चिंता निर्माण करणारे ठरले. विराटने द्विधा अवस्थेत फटका मारल्यानंतर एक्स्ट्रा कव्हरवरील रोहित शर्माने सहज झेल टिपला आणि विराटला 11 चेंडूत केवळ 3 धावांवरच परतावे लागले.
मुंबई इंडियन्सतर्फे ट्रेंट बोल्टनेच (4 षटकात 2-34) किफायतशीर मारा केला. त्याचा अपवाद वगळता अन्य बहुतांशी गोलंदाजांनी निराशा केली. स्टार स्पीडस्टार जसप्रित बुमराहची या लढतीत बरीच धुलाई झाली. त्याला 4 षटकात एकाही बळीशिवाय 42 धावा मोजाव्या लागल्या.