वृत्तसंस्था/ दुबई
लंकेचा माजी वेगवान गोलंदाज व प्रशिक्षक नुवान झोयसावर मॅचफिक्सिंग प्रकरणी सहा वर्षांची बंदी घालण्यात आली आहे.
सामने फिक्स करण्याचा प्रयत्न केल्याबद्दल तसेच भारतातील संशयित बुकीने त्याच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केल्यावर त्याची माहिती न दिल्याबद्दल झोयसावर ही कारवाई करण्यात आली आहे. 31 ऑक्टोबर 2018 पासून त्याचा बंदी कालावधी सुरू झाला आहे. त्यावेळी त्याला तात्पुरते निलंबित करण्यात आले होते. ‘राष्ट्रीय प्रशिक्षकपदी असताना त्याने सर्वांसमोर आदर्श ठेवायला हवा होता. पण त्याऐवजी तो स्वतः भ्रष्ट मार्गात गुंतला आणि इतरांनाही गुंतवण्याचा प्रयत्न त्याने केला,’ असे आयसीसीचे इंटेग्रिटी युनिटचे सरव्यवस्थापक ऍलेक्स मार्शल म्हणाले. सामने फिक्स करण्याने खेळाचा मूळ हेतूच नष्ट होतो आणि आम्ही ते अजिबात खपवून घेणार नाही, असेही ते म्हणाले.
42 वर्षीय झोयसाने लंकेतर्फे 30 कसोटी व 95 वनडे सामने खेळले आहेत. 2017 मध्ये संयुक्त अरब अमिरातने आयोजित केलेल्या टी-10 स्पर्धेत लंका संघाच्या गोलंदाज प्रशिक्षकपदी असताना झोयसाने गैरप्रकार केल्याचा आरोप 2018 मध्येच त्याच्यावर ठेवण्यात आला होता. या प्रकरणाची सखोल चौकशी केल्यानंतर झोयसा दोषी आढळल्याने आयसीसीने त्याच्यावर बंदीची कारवाई केली आहे. याआधीही लंकेच्या काही खेळाडूंवर बंदीची कारवाई करण्यात आली असून याच महिन्यात माजी वेगवान गोलंदाज दिलहारा लोकुहेट्टिगेवर 8 वर्षांची बंदी घालण्यात आली. 2019 मध्ये सनथ जयसूर्याने भ्रष्टाचारविरोधी पथकाला सहकार्य न केल्याबद्दल त्याच्यावरही बंदीची कारवाई झाली होती. त्याआधी 2016 मध्ये ऑफस्पिनर जयानंदा वर्णवीरावर निलंबनाची कारवाई झाली होती.