ओडिया सोसायटी ऑफ युकेकडून घोषणा : 40 कोटी रुपयांचा येणार खर्च : 2024 पर्यंत पूर्ण होणार प्रकल्प
वृत्तसंस्था/ लंडन
ओडिया सोसायटी ऑफ युकेकडून लंडनमध्ये भगवान जगन्नाथाचे भव्य मंदिर उभारले जाणार आहे. हे मंदिर हुबेहुब ओडिशाच्या जगन्नाथ मंदिराप्रमाणेच असणार आहे. जगन्नाथ पुरी सनातन परंपरेच्या चारधामांपैकी एक आहे. शंकराचार्यांकडून स्थापन 4 पीठांपैकी एक गोवर्धन मठ तेथे आहे. मंदिरासाठी ट्रस्ट स्थापन करून जगभरातील भगवान जगन्नाथाच्या भाविकांना जोडले जात आहे.
मंदिरासाठी सुमारे 40 दशलक्ष पौंड (सुमारे 40 कोटी रुपये) खर्च येणार असून ही रक्कम देणग्यांच्या माध्यमातून जमा केली जाणार आहे. सद्यकाळात ग्रेटर लंडनमध्ये याकरता भूखंड शोधला जात आहे. ओडिया सोसायटी ऑफ युकेने स्वतःच्या वार्षिक समारंभात यासंबंधी निर्णय घेतला आहे.
सोसायटी सदस्यांनी प्रारंभिक खर्चासाठी ब्रिटनमध्ये राहत असलेल्या लोकांकडून देणगी मिळविली आहे. मंदिर उभारणीसाठी निर्माण होणाऱया ट्रस्टमध्ये जगभरातील ओडिया लोक आणि भगवान जगन्नाथाचे भक्त समील असावेत, अशी सोसायटीची योजना आहे.
10 ते 12 एकर क्षेत्र
ग्रेटर लंडनमध्ये सोसायटीकडून 10 ते 12 एकरचा भूखंड शोधला जात आहे. यात मंदिराचे मूळ स्वरुप असण्यासह ओडिया संस्कृतीशी संबंधित गोष्टीही असतील. यासंबंधी सोसायटीने पुरी शंकराचार्य जगद्गुरु स्वामी निश्चलानंद सरस्वती यांचे मार्गदर्शन घेतले आहे.
4 वर्षांमध्ये प्रकल्पपूर्ती
मंदिराची उभारणी लवकरात लवकर सुरू होऊन 2024 पर्यंत कुठल्याही स्थितीत ते पूर्ण करण्याची सोसायटीची योजना आहे. संबंधित संघटना आता ओडिया परंपरा ज्यांना जगन्नाथ संस्कृती म्हटले जाते, त्यांना जगभरात प्रसारित करू पाहत आहे. केवळ मंदिर नव्हे तर ओडिया संस्कृतीचे केंद्र म्हणून उभारणी केली जाणार आहे.
ब्रिटनमध्ये 200 हून अधिक मंदिरे
सर्वाधिक हिंदू मंदिरे असलेल्या निवडक देशांमध्ये ब्रिटनचा समावेश आहे. सद्यकाळात ब्रिटनमध्ये हिंदू मंदिरांची संख्या 210 च्या आसपास आहे. ग्रेटर लंडनमध्ये सुमारे 35 मंदिरे आहेत. इस्कॉन स्वामीनारायण संप्रदाय, रामकृष्ण मिशनसह अनेक मोठय़ा संघटनांनी तेथे मंदिरे उभारली आहेत.
अनेक देशांमध्ये जगन्नाथ मंदिर
भगवान जगन्नाथ यांची जगभरात अनेक मंदिरे आहेत. भारताबाहेर सर्वात जुने जगन्नाथ मंदिर बांगलादेशात आहे. तेथील कोमिया येथे 16 व्या शतकातील जगन्नाथ मंदिर आहे. पाकिस्तानच्या सियालकोटमध्ये 2007 साली मंदिर निर्माण करण्यात आले होते. ऑस्ट्रेलिया, इटली, लंडन, सॅन फ्रान्सिस्को, शिकागो, मॉस्को आणि मॉरिशसमध्येही मंदिर आहे.