वादग्रस्त नकाशाच्या पुस्तकावर स्थगिती : चूक झाल्याची कबुली
वृत्तसंस्था/ काठमांडू
चिनी राजदूताच्या इशाऱयावर चालणाऱया नेपाळमधील केपी ओली यांच्या सरकारने वादग्रस्त नकाशा असलेल्या पुस्तकाच्या वितरणाला अखेर स्थगिती दिली आहे. नेपाळच्या शिक्षण मंत्रालयाकडून या पुस्तकातील उल्लेखावर तेथील विदेश तसेच भूव्यवस्थापन मंत्रालयानेच गंभीर आक्षेप घेतला होता. या पार्श्वभूमीवर या पुस्तकाचे वितरण रोखण्यासह त्याच्या प्रकाशनालाही स्थगिती लावण्याचा निर्देश नेपाळच्या कॅबिनेटने शिक्षण मंत्रालयाला दिला आहे. नेपाळ कॅबिनेटच्या या निर्णयामुळे शिक्षणमंत्री गिरिराज मणि पोखरल यांना झटका बसला आहे.
या पुस्तकात अनेक तथ्यात्मक चुका असून ‘अयोग्य’ मजूकर असल्याचे विदेश मंत्रालय तसेच भूव्यवस्थापन मंत्रालयाने म्हटले होते. चुकीच्या दाव्यांसह संवेदनशील मुद्दय़ांवर पुस्तकाचे प्रकाशन करणे अयोग्य पाऊल होते अशी कबुली कायदामंत्र्यांनी दिली आहे.
द्विपक्षीय चर्चेवर प्रभाव
नेपाळने मे महिन्यात भारताच्या भूभागावर दावा सांगणारा नकाशा प्रसारित केला होता. या कृतीमुळे दोन्ही देशांदरम्यान तणाव निर्माण झाला होता. या तणावावर चर्चेद्वारे तोडगा काढण्याची चिन्हे आता दिसू लागली असतानाच नवा वाद उभा ठाकला होता. नेपाळ सरकारने मुलांच्या एका पुस्तकात वादग्रस्त नकाशा प्रसिद्ध केला आहे. याचबरोबर या पुस्तकात भारतासोबत सीमा वाद असल्याचा उल्लेख आहे. नेपाळच्या या कृतीमुळे द्विपक्षीय चर्चेला झटका बसण्याची शक्यता निर्माण झाली होती.
नेपाळी मंत्र्याचा दावा
पुस्तकाचे प्रकाशन भारताच्या कारवाईच्या प्रत्युत्तरादाखल केल्याचा दावा नेपाळचे शिक्षणमंत्री पोखरल यांनी केला आहे. भारताने मागीलवर्षी कालापानीला स्वतःच्या सीमेत दाखवत नकाशा प्रसिद्ध केला होता, असे त्यांचे म्हणणे आहे. कालापानी स्वतःचा भूभाग असल्याचा नेपाळचा दावा आहे. नेपाळच्या नव्या पुस्तकात मुलांना देशाच्या क्षेत्राविषयी शिकविले जात असून यात कथित सीमावादाचा उल्लेखही करण्यात आला आहे.