प्रतिनिधी / बेळगाव :
लायन्स क्लब ऑफ बेळगाव मिडटाऊनतर्फे वडगाव येथील सरकारी पदवीपूर्व महाविद्यालयात पीयुसी द्वितीय वर्षाची इंग्रजी परीक्षा देणाऱया विद्यार्थ्यांना मास्क वितरीत करण्यात आले. दीर्घकाळ लांबणीवर पडलेली इंग्रजी विषयाची परीक्षा गुरुवारी शिक्षण खात्यातर्फे घेण्यात आली. कोरोनाचे संकट लक्षात घेऊन लॉकडाऊनचे सर्व नियम पाळून परीक्षा घेण्यात आली.
विद्यार्थ्यांनी सुरक्षित राहावे आणि निर्धास्तपणे पेपर लिहावा या हेतूने लायन्स क्लबतर्फे सर्व विद्यार्थ्यांना मास्क देण्यात आले. याप्रसंगी रिजनचे चेअरपर्सन लायन ऍडव्होकेट भास्कर पाटील, सचिव विश्वजीत देशपांडे, सतीश पाटील, ऍड. एस. एस. मोरे, रुपा मोरे, प्रशांत कुलकर्णी, प्रकाश हेगनायक, डॉ. नागराज आदी उपस्थित होते. प्राचार्य एम. एस. सज्जन आणि कर्मचाऱयांनी या उपक्रमाबद्दल लायन्स क्लबला धन्यवाद दिले. याच क्लबतर्फे याचवेळी ज्या सफाई कर्मचाऱयांना सध्या काम नाही त्यांना धान्य वितरीत करण्यात आले. एकूण 25 जणांना अत्यावश्यक साहित्याचे किट देण्यात आले.