कणकवलीतील सौमित पटेल या युवकाची किमया : साडेतीन तास एकदा चार्ज केल्यावर 70 किमी धावते : भंगारातील गाडीच्या चेसीसवर बनविली गाडी : गाडीला तीन स्पीड मोडसह रिव्हर्स गिअरही
चंद्रशेखर देसाई / कणकवली:
लॉकडाऊनमुळे घरी असल्याने रिकाम्या वेळेचा सदुपयोग करत कणकवली येथील सौमित किशोर पटेल या इव्हेंट मॅनेजमेंटला शेवटच्या वर्षाला शिक्षण घेणाऱया तरुणाने इलेक्ट्रिक मोटारसायकल तयार केली आहे. आवडीला इंटरनेट रिसर्चची जोड देत सौमितने बॅटरीवर धावणाऱया बनविलेल्या या गाडीला एकूण 50 हजार रुपये खर्च आला. ही मोटारसायकल इको, मीडियम व स्पोर्ट अशा तीन स्पीडमध्ये चालविता येते. सुमारे साडेतीन तास चार्जिंग केल्यानंतर फूल चार्ज होते व एकदा चार्ज केल्यानंतर 50 ते 70 किमी धावते. विशेष म्हणजे या मोटारसायकलला रिव्हर्स गिअरही आहे. लॉकडाऊनच्या वेळेचा केलेल्या सदुपयोगाबद्दल सौमितचे कौतूक होत आहे.
सौमित हा कलमठ-कलेश्वरनगर येथील सॉ मिल चालक किशोर पटेल यांचा मुलगा. दहावीपर्यंतचे शिक्षण वरवडे येथील सेंट उर्सुलामध्ये घेतल्यानंतर अकरावी व बारावीचे शिक्षण त्याने कोल्हापूर येथे घेतले. त्यानंतर पुढील इव्हेंट मॅनेजमेंटच्या शिक्षणासाठी त्याने एनआयईएम, अंधेरी-मुंबई येथे ऍडमिशन घेतले. यंदाचे त्याचे इव्हेंट मॅनेजमेंटच्या शिक्षणाचे शेवटचे वर्ष आहे. मात्र, लॉकडाऊनमुळे तो सध्या गावी कलमठ-कलेश्वरनगर येथे आहे.
भंगारातील इटर्नो गाडीच्या चेसचा वापर
वेगळं काहीतरी करण्याची आवड असलेल्या सौमितने लॉकडाऊनच्या काळातील या वेळेचा सदुपयोग करण्याचा निर्णय घेत इंटरनेटवर सर्च करत बॅटरीवर चालणारी इलेक्ट्रिक मोटारसायकल बनविण्याचा निर्णय घेतला. यासाठी त्याला घरच्या मंडळींचेंही सहकार्य लाभले. यासाठी त्याला गाडीच्या चेसची गरज होती. त्याकरिता त्याने भंगारातून जुन्या इटर्नो गाडीची चेस 2 हजार रुपयांना खरेदी केली व त्यानंतर नेटवर रिसर्च करत ही गाडी बनविली. घरी असताना असेच बसून राहण्याऐवजी त्याने केलेल्या प्रयत्नांना यश मिळून ही इलेक्ट्रिक मोटारसायकल तयार झाली.
गाडी बनविण्यास 50 हजार रुपये खर्च
हे करत असताना सौमितने कमी किंमतीला उपलब्ध असलेली बॅटरी न वापरता, सुमारे 28 हजार रुपये किंमतीची चांगली बॅटरी वापरली. त्यामुळे ही गाडी बनविण्यासाठी सुमारे 50 हजार रुपये खर्च आला. सौमित सांगतो, 12 व्होल्टची बॅटरी वापरली, तर ती चार्ज होण्यासाठी 8 तास लागतात. मात्र, आपण चांगली बॅटरी वापरली. त्याची किंमत अधिक असली, तरीही ही बॅटरी साडेतीन तासांत चार्ज होते. एकदा चार्ज झाल्यानंतर 50 ते 60 किमी चालते.
तीन स्पीडमध्ये गाडी धावण्यासाठी सज्ज
सौमितने यासाठी नेट रिसर्च करत आणखी डोके वापरत ही गाडी तीन स्पीडमध्ये धावण्यासाठी सज्ज केली आहे. यात गाडी इको म्हणजे 25 ते 30 स्पीड, मीडियम म्हणजे 35 ते 40 व स्पोर्ट म्हणजे 50 स्पीडला धावते. स्पीडनुसार ऍव्हरेजमध्ये काहीसा फरत येतो. त्यामुळे एकदा चार्ज झाल्यानंतर ती 50 ते 60 किमी धावू शकते. विशेष म्हणजे या गाडीला रिव्हर्स गिअरची व्यवस्थाही करण्यात आली असल्याने मागे घेणेही शक्य होते. यासाठी चुलत भाऊ अनुज पटेलचे सहकार्य लाभल्याचे सौमितने सांगितले. लॉकडाऊनच्या कालावधीत सौमितने बनविलेल्या या इलेक्ट्रिक मोटारसायकलचे कौतूक होत आहे.
एका आठवडय़ात दुचाकीचे काम पूर्ण!
या दुचाकीला बसविण्यात आलेली बॅटरी 60 व्होल्ट व 24 एएच क्षमतेची आहे. ही बॅटरी चार्जरद्वारे एकदा चार्जिंग केली, की साडेतीन तासांत पूर्ण चार्ज होते व 50 ते 60 किमी दुचाकी चालेपर्यंत चार्जिंग टिकून राहत असल्याचा दावा सौमितने केला आहे. या दुचाकीला बसविलेल्या व्होल्ट मिटरवर बॅटरीचे चार्जिंग किती शिल्लक आहे, ते लक्षात येते. सुमारे 55 ते 60 किमी वेगाने ही दुचाकी धावू शकते. काम सुरू करण्यात आल्यापासून एका आठवडय़ात ही दुचाकी पूर्ण केली, असा दावा सौमितने केला.