15 हून अधिक संस्थांना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप
प्रतिनिधी/ बेळगाव
लोकमान्य मल्टिपर्पज को-ऑप. सोसायटीने सामाजिक गरज ओळखून बेळगाव शहरातील अंध, विकलांग, अनाथ, वृद्ध, एचआयव्हीबाधित यांच्यासाठी कार्य करणाऱया 15 हून अधिक संस्थांना खाद्यपदार्थ आणि जीवनावश्यक वस्तू पुरविल्या आहेत. या सर्व संस्थांचे काम नागरी सहकार्यावर अवलंबून असते. पण आता नागरिक इच्छा असली तरी त्यांच्यापर्यंत पोहोचूच शकत नाहीत. त्यामुळेच लोकमान्यने आता ही मदत केली आहे.
आर्ष विद्या केंद्र, शांताई वृद्धाश्रम, स्वाधार केंद्र, नांगनूर मठ, कल्पवृक्ष फौंडेशन, माऊली वृद्धाश्रम खानापूर, आश्रय सेवाश्रम, होम फॉर होमलेस, करुणालय, नंदन मक्कळधाम, कुटुंब संस्था आदी संस्थांना ही मदत देण्यात आली आहे. या संस्थांना 50 किलो तांदूळ, 5 किलो तूरडाळ, 5 किलो मूगडाळ, 5 किलो चहापावडर, 25 किलो साखर, 20 लीटर तेल या वस्तू देण्यात आल्या.
संस्थापक चेअरमन किरण ठाकुर यांच्या मार्गदर्शनाखाली संचालक पंढरी परब यांनी हे साहित्य पोहोचविले आहे. सर्व आश्रमांच्या संचालकांनी अतिशय गरजेच्या काळात तुम्ही मदतीला धावून आलात. त्यामुळे किरण ठाकुर आणि लोकमान्य परिवार व सर्व संचालक यांचे आभार मानावे तितके कमीच आहेत, असे उद्गार सर्वांनी काढले. या मदतकार्यासाठी सामाजिक कार्यकर्ते माजी महापौर विजय मोरे यांचे बहुमोल सहकार्य लाभले.