प्रतिनिधी/ पणजी
मडगाव येथील कृष्णी ज्वेलर्सचे मालक स्वप्नील वाळके यांच्या खुनाच्या तपासात गुन्हा अन्वेषण विभागाच्या पोलिसांना खाण व्यवहार प्रकणातील धागेदोरे हाती लागले असून हा ‘सुपारी किलिंग’चा प्रकार असावा, असा कयास खास सुत्रांनी व्यक्त केला आहे. पोलीस मात्र हा चोरीचा प्रकार असावा, अशी दिशाभूल करण्याच्या प्रयत्नात आहेत.
मयत स्वप्नीलचे निकटचे एक नातेवाईक खाण व्यवहारात आहेत. या व्यवहारातील देवाणघेवाणीतून हा खून सुपारी देऊन केला असावा, या दिशेने चाललेल्या तपासाला आता गती आली आहे. †िनकटवर्तीय नातेवाईकाची खाण चालवण्यासाठी कोणी घेतली होती? त्यात काय व्यवहार झाला होता? थकबाकी होती काय? याचा कसून तपास चालू आहे.
कर्ज वसुलीच्या मुद्दय़ावर कुटुंबाचे सहकार्य नाही
गुन्हा अन्वेषण विभागातील खास सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार अनेक सराफी दुकानदार सावकारी कर्ज देण्याचा पार्ट टाईम व्यवसाय करतात. त्यामुळे अशा कर्ज वसुलीतून हा खून झाला असावा, असा कयास व्यक्त करून पोलिसांनी त्या दिशेने तपास करून पाहिला, पण स्वप्नीलचे कुटुंबीय त्यात सहकार्य देत नसल्याने पोलिसांनी त्या दिशेने तपास करणे सोडून दिले आहे.
… तर मग चोरीचे कलम अद्याप का लावलेले नाही
हा खून सुपारी किलिंगचा प्रकार नाही तर निव्वळ दुकानदाराला लुटण्यासाठी केलेला चोरीचा प्रकार आहे, असे पोलिसांचे म्हणणे असले तरी अजून पोलिसांनी या प्रकरणात चोरीचे कलम लावलेले नाही. चोरीचे कलम लावण्यास का टाळाटाळ केली जाते, यावर विचारणा केली तेव्हा सीआयडीचे एक पथक अजून हा सुपारी देऊन खून झाल्याच्या मुद्यावर ठाम असल्याचे या सुत्रांनी सांगितले.
हल्लेखोराने केले 20 चाकूचे वार
स्वप्नीलच्या तावडीतून सुटण्यासाठी हल्लेखोराने त्याच्यावर चाकुने 20 वेळा वार केले होते, असे शवचिकित्सा अहवालात आढळले आहे. झपाझप करण्यात आलेले हे वार सोसून स्वप्नीलने हल्लेखोराला पकडण्याचा प्रयत्न केला.
व्हिडिओ कोणी व्हायरल केला
हल्लेखोर मुस्तफा शेखचा व्हिडीओ लगेच व्हायरल झाला. तो कोणी व्हायरल केला याचा शोध पोलीस घेत आहेत. पोलिसांना या प्रकरणातून अजून आवश्यक ते साक्षीदार मिळत नसल्याचे या सुत्रांनी सांगितले. दुकानात लावलेल्या कॅमेरातून व बाहेरील कॅमेरातून टिपलेले छायाचित्रही व्हायरल झाल्याने पोलीस हतबल झाले आहेत.
चोरीसाठीची बॅग कुठे गेली
हा खून चोरी करण्याच्या हेतूने झाला असता तर चोरटय़ाने आपल्या सोबत बॅग नेली असती, पण सदर खुन्याकडे बॅग नव्हती, असे या सुत्रांनी सांगितले. पोलिसांनी जप्त केलेल्या वाहनातही बॅग आढळली नाही. त्यामुळे सदर खून चोरीसाठी झाला नव्हता, त्यात सुपारी देऊन खून झाल्याचा संशय अधिक दाट होतो, असे त्यानी सांगितले.
पोलिसांनी प्रत्येकाला फोन केला
स्वप्नीलच्या मोबाईलवर गेल्या चार महिन्यात आलेल्या व स्वप्नीलने केलेल्या फोनची चाचपणी गुन्हा अन्वेषण विभागाच्या पोलिसांनी केली. प्रत्येकाला जबानीसाठी गुन्हा अन्वेषण विभागाच्या पोलीस स्थानकात बोलावून पाहिले, ज्यांनी येण्यास टाळाटाळ केली त्यांच्यावर नजर ठेवण्यात आल्याचे या सुत्रांनी सांगितले.
खुनानंतर दुकान सील करण्यास पोलिसांकडून उशीर
खुनाची घटना घडल्यानंतर 10 मिनिटांत मडगाव पोलीस घटनास्थळी पोहचले, पण त्यांनी घटनास्थळाचे रक्षण करण्यासाठी काहीच केले नाही. पंचनामा करण्यापूर्वी दुकानात शिरायला कोणालाच द्यायला नको होते, पण दुकान सील करण्यापूर्वी मयताचे अनेक नातेवाईक आत जाऊन आल्याचे सीसीटीव्ही फुटेजमध्ये उघड झाल्याचे या सुत्रांनी सांगितले. मडगाव पोलिसांनी असे का केले, हा प्रश्न आहे.
स्वप्नीलवर झाडलेली गोळी कोणी केली गायब?
मयत स्वप्नील याच्यावर गोळी झाडणारा मुस्तफा शेख हाताला ग्लाऊज घालून आला होता. आत येताच त्याने पिस्तूल काढले. स्वप्नीलवर रोखणार तोच स्वप्नील उठून उभा राहिला. पिस्तूलातून गोळी झाडली ती छातीवर डाव्या बाजूला न घुसता उजव्या बाजूला घुसली. त्यामुळे स्वप्नील जागीच ठार झाला नाही. त्याने त्याच स्थितीत न घाबरता त्या हल्लेखोर मुस्तफाला पकडण्याचा प्रयत्न केला. पिस्तुलाची गोळी छातीतून आरपार गेली होती, पण ती पोलिसांना अजून सापडलेली नाही. ही गोळी कोणी गायब केली, असा मोठा प्रश्न सीआयडी विभागातील पोलिसांना पडला आहे.