वार्ताहर/ विजापूर
वाहनांना अडवून लूट करणाऱया 8 जणांच्या टोळीला पकडण्यात विजापूर पोलिसांना यश मिळाले. संगमेश अगसर, बसवराज मडीवाळर, बसवराज मेटी, शिवानंद शेखप्पा मडीवाळर, बसवराज बिरादार (सर्व रा. बसवन बागेवाडी) व शेखप्पा माळीवाळर, बसवराज बिरादार (रा. टकळ्ळकी) व अल्पवयीन मुलगा यांचा या टोळीत समावेश असल्याची माहिती जिल्हा पोलीसप्रमुख अनुपम अगरवाल यानी पत्रकार परिषदेत दिली.
याबाबतची माहिती अशी की, सोलापूर चित्रदुर्ग महामार्ग क्र. 50 वर मनगोळी रस्त्यावर बसवण बागेवाडी गावातील संगमेश अगसर, बसवराज मडीवाळर, बसवराज मेटी, शिवानंद शेखप्पा मडीवाळर, बसवराज बिरादारसह टकळ्ळी गावातील शेखप्पा मडीवाळर, बसवराज बिरादार व एक अल्पवयीन मुलगा यांनी 22 मे रोजी रात्रीच्यावेळी विजापूरहून दावणगेरीकडे निघालेला ट्रक मनगुळी येथे अडवून चालक व क्लिरनरला चाकू व कोयता दाखवून त्यांच्याकडे असलेले 1,28000 रु. रोख रक्कम व मोबाईल घेऊन फरारी झाले होते.
या दरोडय़ाची फिर्याद ट्रकचालकाने मनगुळी पोलीस ठाण्यात दिली होती. जिल्हा पोलीस प्रमुखांनी ही बाब गंभीरतेने घेऊन या दरोडय़ाच्या तपासासाठी एका विशेष पथकाची नियुक्ती केली होती. 26 रोजी पहाटे 2.30 वाजता मनगुळी हायवेजवळील धाब्याजवळ एक टोळी दरोडा घालण्यासाठी थांबल्याचे आढळून आले. यावेळी पहाटेची गस्त घालणाऱया पोलिसांनी त्यांना ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्यांनी ट्रकचालक व क्लिरनरला धमकावून 1,28000 रु.ची लूट केल्याची माहिती दिली.
पोलीस अधीक्षक राम अरसीददी यांच्या मार्गदर्शनाखाली नियुक्त करण्यात आलेल्या पथकात बागेवाडी पोलीस ठाण्याचे उपपोलीस अधीक्षक शांतवीर, सीपीआय सोमशेखर जुट्टल, मनगुळी पोलीस ठाण्याचे पीएसआय एन. बी. शिवूर, निडगुंडी पीएसआय ए. सी. चिकोडी, पीएसआय बी. एम. बसनगौडर व पोलिसांचा समावेश आहे. पोलिसांनी या टोळीला पकडल्याबद्दल त्यांचे जिल्हा पोलीसप्रमुखांनी अभिनंदन केले आहे.