प्रतिनिधी / बेळगाव
गुरुवर्य वि. गो. साठे मराठी प्रबोधिनीची बैठक मराठी विद्यानिकेतन येथे पार पडली. या बैठकीत राज्य मराठी प्रबोधिनीतर्फे मराठी भाषा संवर्धन आणि समृद्धीसाठी येत्या वर्षभरात विविध उपक्रम आयोजित करण्याचे ठरविले आहे.
प्रबोधिनीतर्फे शालेय विद्यार्थ्यांसाठी व्याकरण स्पर्धा, हस्ताक्षर स्पर्धा, मराठी बालसाहित्य संमेलन याचे आयोजन करण्यात येते. त्याचबरोबर मराठी भाषा दिनही मोठय़ा उत्साहात साजरा करण्यात येतो. यावषी या कार्यक्रमांसोबतच भाषा संवर्धनाची मोहीम राबविली जाणार आहे. या अंतर्गत सीमाभागातील मराठी विषय शिक्षकांसाठी चर्चासत्र व कार्यशाळेचे आयोजन करण्यात येणार आहे. साहित्याची आवड निर्माण व्हावी यासाठी ‘वाचनकट्टा’ या उपक्रमाचे आयोजन करण्यात येणार आहे. महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी काव्यलेखन, नाटय़लेखन, नाटय़दिग्दर्शन व अभिनय या विषयावर कार्यशाळा व सादरीकरणासाठी प्रोत्साहन दिले जाणार आहे.
या सर्व उपक्रमांसाठी राज्य मराठी विकास संस्था, मुंबईच्या बृहन्महाराष्ट्र अर्थसाहाय्य योजनेंतर्गत 2 लाखांचे अर्थसाहाय्य प्राप्त झाले आहे. मागील 3 वर्षांपासून ही संस्था प्रबोधिनीच्या उपक्रमांना अर्थसाहाय्य करीत असल्याचे सांगण्यात आले. यावेळी प्रबोधिनीचे अध्यक्ष जयंत नार्वेकर, उपाध्यक्ष चंद्रकांत पाटील, चिटणीस सुभाष ओऊळकर, प्रा. आनंद मेणसे, मालोजी अष्टेकर, सुरेश गडकरी, चिमणराव जाधव, विजय बोंगाळे, बी. बी. शिंदे, इंद्रजित मोरे, गजानन सावंत, प्रसाद सावंत उपस्थित होते. धिरजसिंह राजपूत यांनी आभार मानले.