आरसीबीविरुद्ध आयपीएल साखळी सामना आज
नवी मुंबई / वृत्तसंस्था
पहिल्या सामन्यात विजयी सलामी दिल्यानंतर केकेआरचा संघ आज (बुधवार दि. 30) आरसीबीविरुद्ध आयपीएल साखळी सामन्यातही तोच विजयी धडाका कायम राखण्यासाठी प्रयत्नशील असेल. आरसीबीला मात्र पहिल्या लढतीत पराभवाचा धक्का सोसावा लागला असून येथे त्यांना हंगामातील पहिल्या विजयासाठी अनुभव पणाला लावावा लागेल. या लढतीला सायंकाळी 7.30 वाजता सुरुवात होईल.
यापूर्वी, सलामी लढतीत श्रेयस अय्यरच्या नेतृत्वाखालील केकेआरने विद्यमान विजेत्या चेन्नई सुपरकिंग्सला 6 गडी राखून पराभवाचा धक्का दिला तर आरसीबीला 200 पेक्षा अधिक धावांचा डोंगर रचूनही पंजाब किंग्सविरुद्ध 5 गडय़ांनी पराभवाचा सामना करावा लागला होता.
आरसीबीचा कर्णधार फॅफ डय़ू प्लेसिस सर्वोत्तम बहरात असून पहिल्या लढतीत अवघ्या 57 चेंडूत 88 धावांच्या खेळीसह याची त्याने उत्तम प्रचिती आणून दिली. आता हाच धडाका आजच्या लढतीतही कायम राखण्याचे त्याचे प्रयत्न असणार आहेत. सलामीवीर अनुज रावतला आश्वासक प्रारंभाचे मोठय़ा खेळीत रुपांतर करता आले नव्हते. आता सातत्य राखण्यासाठी तो निर्धाराने मैदानात उतरणे अपेक्षित आहे.
नेतृत्वाचे ओझे उतरल्यानंतर विराट कोहलीने पंजाबविरुद्ध फलंदाजीतील आपले आक्रमक इरादे अधोरेखित केले. येथेही त्याने फलंदाजीतील गतवैभवाकडे आणखी एक महत्त्वाकांक्षी पाऊल टाकण्याची अपेक्षा असेल. यष्टीरक्षक-फलंदाज दिनेश कार्तिकने मागील लढतीत लक्षवेधी खेळी साकारली. येथेही त्याला यश लाभले तर आरसीबी मोठी धावसंख्या रचू शकेल किंवा मोठय़ा धावसंख्येचा सहज पाठलाग करु शकेल. आरसीबीचे आघाडीचे चारही फलंदाज एकाच वेळी क्लिक झाले तर त्यांना रोखणे केकेआरसाठी अर्थातच आव्हानात्मक असेल.
गोलंदाजीच्या आघाडीवर मोहम्मद सिराजची मागील सामन्यातील खराब कामगिरी आरसीबीसाठी चिंतेची ठरली होती. सिराजला त्यावेळी तब्बल 59 धावा मोजाव्या लागल्या. आणखी एक डेथ ओव्हर्स स्पेशालिस्ट व मागील आवृत्तीतील पर्पल कॅप विजेता हर्षल पटेल, लंकेचा आघाडीचा फिरकीपटू वणिंदू हसरंगा यांचा फॉर्मही या संघासाठी महत्त्वाचा असेल.
रहाणेच्या फॉर्ममुळे केकेआरला दिलासा
आजच्या लढतीत केकेआरच्या गोलंदाजांसमोर प्लेसिसला रोखणे हेच मुख्य आव्हान असेल, हे सुस्पष्ट आहे. केकेआरने यापूर्वी चेन्नई सुपरकिंग्सविरुद्ध सलामी लढतीत सर्व आघाडय़ांवर दमदार प्रदर्शन साकारले होते. तोच धडाका येथेही कायम राखण्याचा त्यांचा प्रयत्न असेल. अजिंक्य रहाणेला सूर सापडला, ते केकेआरसाठी दिलासा देणारे ठरले. अष्टपैलू वेंकटेश अय्यरला पहिल्या सामन्यात 16 धावांवर समाधान मानावे लागले असले तरी तो कोणत्याही गोलंदाजाचा जोरदार समाचार घेऊ शकतो, हे लक्षवेधी आहे.
कर्णधार श्रेयस अय्यरसह सॅम बिलिंग्ज व शेल्डॉन जॅक्सन यांच्यावर मध्यफळीची जबाबदारी असेल. गोलंदाजीच्या आघाडीवर उमेश यादवने वानखेडेवर सनसनाटी मारा केला. मात्र, शिवम मावी, फिरकीपटू वरुण चक्रवर्ती, सुनील नरेन यांना अधिक काटेकोर मारा करावा लागणार आहे.
अष्टपैलू आंद्रे रसेलचे योगदान देखील या संघासाठी महत्त्वाचे ठरेल. केकेआर प्रँचायझी मागील विजयी संघात फारसे बदल करण्याची शक्यता नाही. ही लढतही सायंकाळच्या सत्रातील असल्याने डय़ू फॅक्टर महत्त्वाचा असेल आणि आणखी एकदा हाय स्कोअरिंग लढत झाली तर यात आश्चर्याचे कारण नसेल.
संभाव्य संघ
आरसीबी ः फॅफ डय़ू प्लेसिस (कर्णधार), विराट कोहली, ग्लेन मॅक्सवेल, मोहम्मद सिराज, हर्षल पटेल, वणिंदू हसरंगा, दिनेश कार्तिक, जोश हॅझलवूड, शाहबाज अहमद, अनुज रावत, आकाश दीप, महिपाल लोमरोर, फिन ऍलन, शेरफेन रुदरफोर्ड, जेसॉन बेहरेनडॉर्फ, सुयश प्रभुदेसाई, चमा मिलिंद, अनिश्वर गौतम, कर्ण शर्मा, डेव्हिड विली, लुव्हनिथ सिसोदिया, सिद्धार्थ कौल.
केकेआर ः श्रेयस अय्यर (कर्णधार), ऍरॉन फिंच, अभिजीत तोमर, अजिंक्य रहाणे, बाबा इंद्रजीत, नितीश राणा, प्रथम सिंग, रिंकू सिंग, अशोक शर्मा, पॅट कमिन्स, रसिका दार, शिवम मावी, टीम साऊदी, उमेश यादव, वरुण चक्रवर्ती, अमन खान, आंद्रे रसेल, अनुकूल रॉय, चमिका करुणारत्ने, मोहम्मद नबी, रमेश कुमार, सुनील नरेन, वेंकटेश अय्यर, सॅम बिलिंग्ज, शेल्डॉन जॅक्सन.
सामन्याची वेळ ः सायं. 7.30 वा.