नगरविकास खात्याने स्वसाहाय्य संघटनेकडे सोपविली आराखडा तयार करण्याची जबाबदारी
प्रतिनिधी / बेळगाव
शहराच्या स्वच्छतेचा आराखडा तयार करण्याची जबाबदारी नगरविकास खात्याने स्वसाहाय्य संघटनेकडे सोपविली आहे. त्यामुळे या आराखडय़ाची माहिती बुधवारी महापालिकेसमोर सादर करण्यात आली. पण शहरातील सध्याची माहिती आणि तयार करण्यात आलेल्या आराखडय़ामध्ये काही त्रुटी असल्याने त्या दुरुस्त करण्याच्या सूचना महापालिकेच्या अधीक्षक अभियंत्या लक्ष्मी निपाणीकर यांनी केल्या.
राज्यातील 30 स्थानिक स्वराज्य संस्थांच्या स्वच्छतेची माहिती घेऊन स्वच्छतेच्या कामकाजाचे नियोजन करण्यासाठी आराखडा तयार करण्याचे काम सुरू करण्यात आले आहे. सदर आराखडा तयार करण्याची जबाबदारी ऑल इंडिया इन्स्टिटय़ूट ऑफ लोकल सेल्फ गव्हर्न्मेंट या संस्थेकडे सोपविण्यात आली आहे. प्रत्येक स्थानिक स्वराज्य संस्थेची माहिती आणि स्वच्छतेचे नियोजन याची माहिती घेऊन आराखडा तयार करण्याची सूचना करण्यात आली आहे.
बेळगाव महापालिकेतील स्वच्छतेचे काम कोणत्या प्रकारे झाले पाहिजे, कचरा उचलीचे नियोजन, कचऱयाची विल्हेवाट आदींसह विविध कामांचा आराखडा तयार करण्यात येत आहे. स्वसाहाय्य संघटनेने तयार केलेल्या आराखडय़ाची माहिती बुधवारी महापालिकेसमोर सादर करण्यात आली. महापालिका आयुक्त जगदीश के. एच. बेंगळूरला गेले असल्याने त्यांच्या अनुपस्थितीत शहर स्वच्छतेच्या आराखडय़ाची माहिती अधीक्षक अभियंत्या लक्ष्मी निपाणीकर यांनी घेतली.
स्वसाहाय्य संघटनेने सादर केलेल्या माहितीमध्ये काही त्रुटी असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. यावेळी शहराची व्याप्ती, जमा होणारा कचरा आणि नियोजन याचा व्यवस्थित तपशील घेऊन आराखडा तयार करण्याची सूचना अधीक्षक अभियंत्या निपाणीकर यांनी केली. सुधारित आराखडा दहा दिवसांत सादर करण्याची सूचना स्वसाहाय्य संघटनेला करण्यात आली. यावेळी महापालिकेचे आरोग्य अधिकारी डॉ. संजय डुमगोळ, पर्यावरण साहाय्यक कार्यकारी अभियंते एच. व्ही. कलादगी, पर्यावरण साहाय्यक अभियंते आदिलखान पठाण, प्रवीण किलारी, अभियंत्या महादेवी व स्वसाहाय्य संघटनेचे प्रतिनिधी उपस्थित होते.