वृत्तसंस्था / नवी दिल्ली
शेतकरी आंदोलनादरम्यान 65 वषीय संत बाबा रामसिंग यांनी कृषी कायद्याच्या विरोधात शेतकऱयांच्या समर्थनार्थ आत्महत्या केली आहे. आत्महत्या करणारे संत करनालच्या सिंघारा गावातील रहिवासी आहेत. सिंघाराचे गुरुद्वारा साहिब नानकसारांचे ग्रंथी होते. त्यांच्या अनुयायांची संख्या लाखोंमध्ये नोंदविली जात आहे. संत रामसिंग यांनी गोळी घालून आत्महत्या करण्यापूर्वी पंजाबी भाषेत सुसाईड नोट लिहून ठेवली आहे. या चिठ्ठीत त्यांनी हा दडपशाहीविरुद्धचा आवाज असल्याचे नमूद केले आहे. दिल्ली शीख गुरुद्वारा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष मनजिंदरसिंग सिरसा यांनी आत्महत्येबद्दल दु:ख व्यक्त केले आहे.
संत बाबा रामसिंग यांनी कोंडली सीमेवर आत्महत्या केली. हा प्रकार घडताच त्यांना तातडीने नजिकच्या इस्पितळात हलविण्यात आले. मात्र, येथे डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. त्यानंतर त्यांचा मृतदेह करनाल येथे नेण्यात आला. रामसिंग बुधवारी सहकारी शेतकऱयांसह गाडीने कोंडली सीमेवर आले होते. त्यानंतर त्यांचे सहकारी व्यासपीठाच्या दिशेने गेल्यानंतर काही वेळातच रामसिंग यांनी स्वतःवर गोळी झाडून घेत जीवनयात्रा संपवली.