प्रतिनिधी /बेळगाव
महापालिका निवडणुकीसाठी प्रचार यंत्रणा जोरदार कामाला लागली आहे. प्रत्येक मतदाराच्या घरी जाऊन गाठीभेटी घेण्यात येत आहे. तसेच वाहन आणि स्पिकरसाठी परवानगी देण्यात आल्याने मंगळवारी शहरात प्रचाराचा आवाज घुमला. यामुळे निवडणूक असल्याचे चित्र दिसून आले. प्रचारादरम्यान मराठी भाषिक उमेदवारांचा वरचष्मा असल्याचे आढळून आले.
कोरोना नियमावलीमुळे प्रचार करताना उमेदवारांना व समर्थकांना तारेवरची कसरत करावी लागली. मात्र शेवटच्या टप्प्यात वाहन आणि स्पिकर वापरण्यासाठी परवानगी देण्यात आली. पण जाहीर प्रचारासाठी मंगळवार एकच दिवस असल्याने काही उमेदवारांनी प्रचारादरम्यान रिक्षा आणि स्पिकरचा अवलंब केला. शहरातील विविध भागात रिक्षाद्वारे व स्पिकरद्वारे प्रचार करण्यात आला. ज्या वॉर्डची व्याप्ती मोठी आहे अशा वॉर्डमध्ये उमेदवारांना मतदारापर्यंत पोहोचणे अशक्य होते. अशा उमेदवारांनी रिक्षा आणि स्पिकरचा वापर करून मतदारापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे मंगळवारी दिवसभर शहरात प्रचाराचा आवाज घुमला.
प्रचारासाठी राष्ट्रीय पक्षांनी वरिष्ठ नेतेमंडळींची मदत घेतली आहे. पण स्थानिक पातळीवरील निवडणूक असल्याने मराठी मतदारांनी स्वतःच्या कर्तृत्वावर प्रचार केला. सध्या शहरात प्रचारामध्ये मराठी भाषिकांचा वरचष्मा असून वॉर्ड क्र. 44 मधील म. ए. समितीचे उमेदवार पंढरी परब यांनी प्रचारात आघाडी घेतली आहे. यापूर्वी नगरसेवक म्हणून काम करताना वॉर्डमधील विविध समस्यांचे निवारण करून नागरिकांसाठी सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत. वॉर्ड मर्यादित न राहता संपूर्ण शहराच्या दृष्टीने विकासकामे राबविण्याचे ध्येय घेऊन पंढरी परब हे पुन्हा निवडणूक लढवित आहेत. त्यामुळे वॉर्डमधील जाणकारांनी व सुशिक्षित नागरिकांनी त्यांना पाठिंबा देऊन निवडून आणण्याचा निर्धार केला आहे. त्यामुळे वॉर्ड क्र. 44 मधून पंढरी परब यांचा विजय निश्चित असल्याच्या प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत.
वॉर्ड क्र. 54 हा सामान्य महिलासाठी खुला आहे. त्यामुळे राष्ट्रीय पक्षांसह सहा अपक्ष उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. मराठी भाषिक उमेदवार किरण राजू आजगावकर यांच्या पाठिशी चन्नम्मानगर येथील जनता आहे. वॉर्ड क्र. 54 मध्ये येणाऱया परिसरातील घरोघरी जाऊन नागरिकांच्या गाठीभेटी घेऊन मतदान करण्याची विनंती केली. तसेच या परिसरातील विविध मंडळांचा आणि रहिवाशांचा पाठिंबा त्यांना आहे. सर्वच स्तरातून त्यांना उत्स्फूर्त पाठिंबा असून निवडून आणण्याचा निर्धार या वॉर्डातील नागरिकांनी केला आहे.
वॉर्ड क्र. 41 मधून माजी नगरसेवक रतन मासेकर हे निवडणूक लढवित आहेत. यापूर्वी नगरसेवक आणि स्थायी समिती अध्यक्ष म्हणून चांगली कामगिरी बजावली होती. पेशाने वकील असलेल्या रतन मासेकर यांनी वॉर्डातील समस्या निवारणाबरोबरच नागरिकांच्या अडचणी सोडविण्यासाठी प्राधान्य दिले आहे. त्यामुळेच वडगाव परिसरातील विविध मंडळे, गणेशोत्सव मंडळे, पंच मंडळी तसेच नागरिक रतन मासेकर यांच्या पाठिशी आहेत. त्यांना भरघोस मतांनी निवडून आणण्याचा निर्धार करण्यात आला आहे. त्यामुळे त्यांचे पारडे जड झाले आहे.
वॉर्ड क्र. 49 मधून अनेक मराठी भाषिकांनी उमेदवारांनी अर्ज दाखल केले आहेत. पण उमेदवारांच्या भाऊगर्दीमुळे मतदारांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे. त्यामुळे येथील पंचमंडळींनी व महिला मंडळ, युवक मंडळांनी वर्षा आजरेकर यांना पाठिंबा व्यक्त करून त्यांना निवडून देण्याचा निर्धार केला आहे. त्या यापूर्वी नगरसेविका म्हणून चांगली कामगिरी केली आहे. आजही वॉर्डमधील नागरिकांच्या संपर्कात असतात. त्यामुळे त्यांच्या पाठिशी विविध मंडळे ठामपणे उभी असून त्यांना निवडून देण्यासाठी मतदान करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. त्यामुळे वॉर्ड क्र. 49 मध्ये वर्षा आजरेकर यांचा वरचष्मा आहे.