प्रतिनिधी/ धारबांदोडा
सोनावळी-कुळे येथील श्री कलनाथ सातेरी दुधसागर देवतांचा वर्धापनदिन मोठय़ा उत्साहात साजरा करण्यात आला. मोठय़ा संख्येने यावेळी भाविकांनी उपस्थिती लावून देवदर्शन घेतले. सकाळी धार्मिक विधी झाल्यानंतर दुपारी महाप्रसाद झाला. हजारो भाविकांनी या महाप्रसादाचा लाभ घेतला.
उपमुख्यमंत्री बाबू कवळेकर, माजी आमदार गणेश गांवकर, पोलीस उपअधिक्षक मनोज म्हार्दोळकर, विनायक गांवस व इतर मान्यवरांनी देवतांचे दर्शन घेतले. भाविकांची अलोट गर्दी असल्याने वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. सकाळपासूनच येथील वाहतूक कोंडीला सुरुवात झाली होती. अनेक भाविक तासनतास वाहनात अडकून पडले. यामुळे बऱयाच प्रमाणात भाविकांनी नाराजी व्यक्त केली. तरीही कुळे पोलीस स्थानकाचे निरीक्षक संजय दळवी यांनी वाहतूकीवर नियंत्रण ठेवण्याचा प्रयत्न केला. प्रथमच मोठी गर्दी असल्याने वाहने पार्क करुन ठेवायला जागाही कमी पडली, यामुळे काहींनी रस्त्याच्या बाजूलाच वाहने पार्क करुन ठेवली होती. रात्रौ सांस्कृतिक कार्यक्रम झाला.