विदेशातील क्लबमध्ये खेळण्यासाठी घेतला निर्णय
वृत्तसंस्था/ कोची
केरळ ब्लास्टर्स फुटबॉल क्लबचा चेहरा म्हणून ओळखल्या जाणाऱया संदेश झिंगनने या क्लबशी फारकत घेण्याचा निर्णय घेतला आहे. गेल्या सहा वर्षापासून या क्लबचे प्रतिनिधित्व केल्यानंतर 26 वर्षीय संदेशने विदेशातील क्लबमधून खेळण्यासाठी ब्लास्टर्स क्लब सोडणार असल्याचे सांगितले आहे. मात्र विदेशातील कोणत्या संघातून तो खेळणार, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.
ब्लास्टर्स संघ सध्या आर्थिक अडचणींतून जात असून त्यांनी अनेक खेळाडूंना वेतन कपात स्वीकारण्याची सूचना केली असल्याचे समजते. संदेशने 2017 मध्ये या क्लबशी 3.8 कोटी रुपयांचा करार केला तेव्हा भारतीय लीगमधील तो सर्वाधिक मानधन घेणारा डिफेंडर बनला होता. केरळ क्लबशी त्याचा अद्याप दोन वर्षाचा करार बाकी होता. पण क्लबने आर्थिक बाजू सुरक्षित ठेवण्याचा निर्णय घेतल्याने संदेशने क्लब सोडण्याचा निर्णय घेतला असावा, असे मानले जात आहे. 2014 मध्ये आयएसएलची सुरुवात झाल्यापासून तो या संघात असून सर्वाधिक 76 सामन्यांत त्याने क्लबचे प्रतिनिधित्व करण्याचा विक्रम केला आहे. आयएसएलच्या पहिल्या आवृत्तीत तो वर्षातील सर्वोत्तम उदयोन्मुख खेळाडू पुरस्काराचा मानकरी ठरला होता.