ऑनलाईन टीम / मुंबई :
प्रसिद्ध उद्योजक मुकेश अंबानी यांच्या घरासमोर स्कॉर्पिओ गाडीत स्फोटके सापडली होती. या प्रकरणाचा तपास एनआयएकडून सुरू होता. शनिवारी तब्बल 13 तास चौकशी केल्यानंतर रात्री 11 वाजून 50 मिनिटांनी सहायक पोलीस निरीक्षक सचिन वाझे यांना एनआयएने अटक केली. आज त्यांना न्यायालयात हजर करण्यात येणार आहे.
अंबानी यांच्या घरासमोर स्फोटके असलेली स्कॉर्पिओ लावण्यात आणि मनसुख हिरेन यांच्या हत्या प्रकरणात वाझे यांचा सहभाग असल्याचा आरोप आहे. वाझे यांनी यापूर्वी सत्र न्यायालयात धाव घेऊन अंतरिम जामीनासाठी प्रयत्न केले होते. मात्र, न्यायालयाने या प्रकरणाचा तपास करण्यासाठी पोलीस कोठडीची गरज असल्याचे सांगत त्यांचा जामीन फेटाळला होता. सत्र न्यायालयाने अंतरिम जामीन फेटाळल्यानंतर वाझे यांच्यावर आयपीसीच्या कलम 286, 465, 506 (2), 120(बी) आणि (4) (ए) बी (आय) स्फोटक वस्तू कलम 1908 अंतर्गत कारवाई करण्यात आली.