नवी दिल्ली
केंद्र सरकारने दहशतवादी संघटनांविरोधातील कारवाई अधिक तीव्र करताना लष्कर-ए-तोयबाचे सदस्य शेख सज्जाद उर्फ सज्जाद गुल आणि अल बद्र संघटनेचा सदस्य अर्जुमंद गुलजार दार उर्फ हमजा बुरहान या आणखी दोघांना बुधवारी दहशतवादी घोषित केले आहे. या दोघांचाही अनेक दहशतवादी कट-कारस्थानांमध्ये प्रत्यक्ष सहभाग असल्याचे स्पष्ट झाले आहे. सज्जाद गुल हा 2018 मधील श्रीनगरमध्ये पत्रकार शुजात बुखारी यांच्या हत्येच्या कटात सामील होता.
विविध दहशतवादी कारवायांवर अंकुश ठेवण्यासाठी केंद्र सरकार एकापाठोपाठ एक महत्त्वाचे निर्णय घेत आहे. त्यानुसार गेल्या आठवडय़ातच केंद्रीय गृहमंत्रालयाने अल-उमर-मुजाहिद्दीनचा संस्थापक आणि मुख्य कमांडर मुश्ताक अहमद जरगर याला बेकायदेशीर कृत्य (प्रतिबंध) कायदा-1967 अंतर्गत दहशतवादी म्हणून घोषित केले होते. जरगर जम्मू-काश्मीर लिबरेशन प्रंट या दहशतवादी संघटनेशी संबंधित होता आणि अवैध शस्त्रास्त्रे आणि दारूगोळा प्रशिक्षण घेण्यासाठी तो पाकिस्तानात गेला होता. तो केवळ भारतासाठीच नाही तर जगातील शांततेलाही धोका असल्याचा दावा गृहमंत्रालयाने केला आहे. जरगर याचा 1999 मध्ये अफगाणिस्तानातील कंदहार येथे इंडियन एअरलाईन्स विमानाच्या अपहरणात सहभाग होता. 24 डिसेंबर 1999 रोजी नेपाळमधील काठमांडूहून नवी दिल्लीला जाणारे इंडियन एअरलाईन्सचे विमान अपहरण करून अफगाणिस्तानातील कंदहार येथे नेण्यात आले होते.
यापूर्वी गेल्या आठवडय़ात केंद्राने मुंबईतील 26/11 च्या दहशतवादी हल्ल्याचा मुख्य सूत्रधार आणि लष्कर-ए-तोयबाचा संस्थापक हाफिज सईदचा मुलगा हाफिज तल्हा सईद याला दहशतवादी घोषित केले होते. यासाठी गृहमंत्रालयाने अधिसूचना जारी करत लष्कर-ए-तोयबाने भारतात केलेल्या हल्ल्यांचे नियोजन, निधी आणि भरतीमध्ये 46 वषीय हाफिज तल्हा सईदचाही सहभाग असल्याचे स्पष्ट केले होते.