धनंजय क्षीरसागर / वडूज :
माणदेशातील ब्रम्हचैतन्य महाराजांच्या वास्तव्याने पावन झालेल्या पुण्यभूमी गोंदवलेचे माहेर तर श्री जानुबाई देवीच्या कुशीतील सातेवाडी हे सासर. माहेर व सासर या दोन्ही ठिकाणी असलेले उच्चविद्याभूषण, सामाजिक बांधिलकीचा वसा, यामुळे सरपंच वृषाली विक्रम रोमन यांच्या कार्यकर्तृत्वाचा दरवळ परिसरात चांगलाच घुमत आहे.
गोंदवले येथील प्रगतशील शेतकरी नेताजी शिवाजी कट्टे यांच्या द्वितीय कन्या. त्यांचे वडील शेती व्यवसाय तर आई सिमाताई या आदर्श गृहिणी. या दांपत्याने त्यांना एमएससी बीएडपर्यंत शिक्षण दिले. शिक्षणानंतर दोन वर्ष त्यांनी पुणे येथील व्हीआयटी कॉलेजमध्ये प्राध्यापिका म्हणून नोकरी केली. त्यांच्या चुलत भगिनी प्रेरणा जीवन कट्टे या पिंपरी चिंचवड विभागाच्या एसीपी आहेत. तर दुसऱ्या भगिनी कु. प्रगती कट्टे यांनी लोकसेवा आयोग परीक्षेच्या माध्यमातून नायब तहसिलदार व वनक्षेत्रपाल या दोन परिक्षांत यश मिळविले आहे. त्यांच्या आत्या सविता कट्टे यांनी गोंदवले गटाचे जिल्हा परिषद सदस्य म्हणून काम पाहिले आहे. त्यावेळी वृषाली यांनी त्यांच्या कामकाजाचे बारकावे जवळून अनुभवले व त्याचवेळी त्यांना राजकारणाचे बाळकडू मिळाले.
2011 मध्ये त्यांचा विवाह सातेवाडी येथील पोस्टमास्तर हरिहर पांडुरंग रोमन यांचे सुपूत्र विक्रम यांच्याशी झाला. विक्रम यांचे शिक्षण मेकॅनिकल इंजिनीअरींग डिप्लोमा व सिव्हील बीटेक आहे. त्यांनी काही काळ मुंबई येथील क्रीडल रनवे या कंपनीत प्रोजेक्ट मॅनेजर म्हणून काम केले. त्यानंतर नोकरीच्या मर्यादा लक्षात आल्यानंतर पुणे येथे बांधकाम व्यवसाय सुरू केला. पुणे परिसरात व्यक्तीगत व भागीदारी स्वरूपात त्यांनी शंभरपेक्षा अधिक सदनिका, गृहप्रकल्प केलेत. पतीच्या या सर्व व्यापात सौ. वृषाली मनापासून सहकार्य करत असतात.
अलीकडच्या काळात विक्रमशेठ यांनी जन्मभूमीच्या विकासासाठी सातेवाडी गाव परिसरात स्वत:ला झोकून देऊन काम सुरू केले आहे. पतीला साथ देण्याच्या उद्देशाने रोमन याही गावी आल्या. त्यांनी गावातील शेती, बांधकाम व्यावसायिक व इतर कामांत सहकार्याची भूमिका घेतली आहे. त्यांच्या कामाची दखल घेऊन गावातील लोकांनी त्यांना जानेवारी 2021 मध्ये ग्रामपंचायत सदस्यपदी मताधिक्क्याने निवडून दिले. फेब्रुवारी महिन्यात योगायोगाने त्यांना सरपंचपदाची संधी मिळाली. अल्पावधीत त्यांनी आपल्या कामाची चुणूक दाखविली. त्यांच्यातील कार्यतत्परता पाहून त्यांना सरपंच परिषद मुंबईच्या महिला आघाडीचे खटाव तालुका अध्यक्षपदही दिले आहे. या पदाच्या माध्यमातून त्या महिला सरपंचांचे प्रश्न सोडविण्यासाठी अहोरात्र परिश्रम घेतात. केवळ सहा महिन्यांत एक कोटींपेक्षा अधिक रकमेची कामे मंजूर करून मान्यवरांच्या हस्ते त्याचा शुभारंभही केला आहे. या कामांत वडूज सातेवाडी मुख्य रस्ता, जन्नीमाता सभामंडप, अंगणवाडी इमारत, गाव अंतर्गत सिमेंट कॉक्रीट रस्ते आदी कामांचा समावेश आहे. या कामाच्या शुभारंभासाठी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर, आ.जयकुमार गोरे, आ. गोपीचंद पडळकर, भाजपा जिल्हा संपर्क प्रमुख सदाभाऊ खाडे, तालुकाध्यक्ष धनंजय चव्हाण आदीसह शेकडो मान्यवर उपस्थित होते. या त्यांच्या कार्यक्रमाचा राज्यभर गवगवा झाला होता.
रोमण दांपत्याने गावातील सहकाऱ्यांना मदतीला घेऊन कोरोनात प्रभावी काम केले होते. त्यांनी शाळेत अद्यावत विलगीकरण कक्ष तयार केला. या कक्षात ऑक्सिजन मशिन, गोळ्या औषधे व इतर सुविधा दिल्या होत्या. या कार्याबद्दल जिल्हाधिकारी शेखर सिंह, प्रांताधिकारी जनार्दन कासार, तहसिलदार किरण जमदाडे व मान्यवरांनी सरपंच रोमन यांचे कौतुक केले होते.
औषध निर्मिती शास्त्राचे धडे
रोमन या केमिस्ट्री विषयात एमएससी बीएड आहेत. तरीही त्यांनी आता मायणी येथील कॉलेजमध्ये बीफार्मसीसाठी प्रवेश घेतला आहे. कोरोना संसर्गजन्य आजाराच्या पार्श्वभूमीवर लोकांच्या वैद्यकीय गरजांची निकड लक्षात घेऊन सरपंच पदावर असताना सुध्दा त्या औषधशास्त्र शिक्षणाचे धडे घेत आहेत. त्यांच्या या शिकावू वृत्तीचे कौतुक होत आहे.